झळी
खुपदा झळी लागते, पावसाची.
हप्त्यावर काम करणाऱ्या मजुराला
अशावेळी सोडता येत नाही मालकाचं घर.
रस्ते पायफसणीचे झाले की
मजूर असतो मालकाच्या घरी.
बैल पाणी पीत नसला तरी
त्याच्यापुढे पाणी मांडावं लागतं.
शेण काढावं लागतं खरडून खरडून.
झाडलोट करावी लागते पुन्हापुन्हा.
मागच्या झळीत नीट ठेवलेलं
सगळं सामान पुन्हा नीट ठेवावं लागतं.
एकूण काय तर मालकाला दिसायला हवं
मजुराचे हात चालू आहेत ते.
कधी कधी किंवा नेहमी नेहमीच
मजुराची बायको आजारी असते.
मायच्या पोटात गोळा झालेला असतो.
सरकारी दवाखान्याच्या येरझाऱ्यापायी
मजूर मारतो एखाद दिवसाची च्याट
आणि होतो नंतर कामावर हजर.
मालकाला निमित्तच पाहिजे असतं फणफणण्याच.
एक दोन दिवसांच्या गैरहजेरीचा हिशोब म्हणून
मालक सणकन लगावतो मजुराच्या कानफडीत.
मजुराला काहीही करता येत नाही.
तो काढतो खरवडून खरवडून शेण पुन्हा
मांडतो बैलापुढे पाणी
इथे ठेवलेलं सामान पुन्हा तिथे ठेवतो.
सणसण करणारा कान घेवून घरी येतो.
मुलाला सांगतो की बाबा पुस्तक वाच.
मुलगा पुस्तक वाचत नाही.
आणि अशावेळी काहीबाही मनात येवूनही
तो फक्त
पकडतो मुलाचे कान
आणि बसवतो त्याला अभ्यासाला
मुलगा खरडतो मग पाटीवर शब्द
लावतो अ ला अ आणि ब ला ब
मांडू पाहतो नीट बाराखडी.
तेव्हा मजूर लपवू शकत नाही
चेहऱ्यावर दाटून येणारं जोरदार समाधान
मालकाच्या कानफडात सणकन वाजवल्याचं.