ब्लॉग शोधा

गुरुवार, २० जून, २०१९

रॉड

पानावर उमटणारी त्याची अक्षरं
उमलून येतात फुलं फुलून येतात तशी
मानवी असण्याचा एक सरळ अर्थ
प्रकट होतोय त्याच्या अक्षरात
त्याची अक्षरं कधी रेषा सोडत नाहीत
आणि तोही सोडत नाही रेषांच्या मर्यादा
म्हणूनच की काय मानवी विधीविधानाची
त्याच्याकडूनच आहे अपेक्षा.

मेंदूच्या मध्याबिंदूपासून ते
बरोबर मायांगाच्या मधोमध
त्याचा अंगात एक रॉड आहे.
उपजत जन्मासोबत आलेला
तुटलेला अवयव सरळ नीट व्हावा
यासाठी डॉक्टर टाकतात तसा.
त्यामुळे त्याचं तसं सगळं सरळच आहे.
मान ताठ आहे ,मेंदू जागेवर आहे,
मन स्थिर आहे आणि वासना नियंत्रणात .
आतडे असतात गुंतागुंतीचे
म्हणून तेेवढे आतडेच आहेत पिळवटलेले.

रॉडचा सरळपणा आणि भरीवपणाच की
त्याला लवता येत नाही ,वाकता येत नाही.
अवतीभोवती लोक वाकतात तसे.
त्याचा खिश्यापर्यंत पोहचत नाही हात.
त्यामुळेच कि काय
आतड्याच पिळवटणं आणि अंगातला रॉड
याचा त्याने एकाएक आज लावून घेतला संबंध.

आणि घरगुती चिमट्याने पायात रुतलेला काटा
अल्लाद उपटावा तसा त्याने अचानकच
उपटून काढलाय अंगातला रॉड.
आणि आता त्याच्या लक्षात आलंय की
आता त्याला नीट वाकता येतं.
लोळता येतं ,लोटांगणही घेता येतं
हात पसरता येतात ,मान झुकवता येती.
उड्या मारता येतात ,पळून जाता येतं.
आता खिश्यापर्यंतही पोहचतो आहे हात नीट.

मानवी असण्याचा हा नवा साक्षात्कार
त्याने स्वीकारला अल्लाद.
आता काळजी अधिक गडद झाली आहे
पुन्हा मानवी विधीविधानाचीच.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट