ब्लॉग शोधा

रविवार, २८ एप्रिल, २०२४

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी
डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष,त्यांची कार्यशैली,त्यांचे कष्ट,त्यातून निर्माण झालेले मानवतावादी कार्य आणि बाबासाहेबांचे एकूण तत्वज्ञान ही अखिल विश्वासाठी,विश्वाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्माण झालेली संपत्ती आहे.आज कोणतेही राष्ट्र,राज्य वा समूह हा डॉ.आंबेडकरांच्या वैचारिक,सामाजिक,राजकीय आणि आर्थिक भूमिकेशिवाय स्वतंत्र विचार करू शकत नाही.बाबासाहेबांच्या ह्या भूमिकांना,तत्वांना खूप मोठा इतिहास आहे.हा इतिहास अगदी ज्योतिबा फुल्यांपासून मागे, थेट कबीर ते थेट महात्मा गौतम बुद्धापर्यंत जातो.त्यामुळे स्वातंत्र,समता आणि बंधुता या तत्वत्रयीच्या आधारे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचा जो संघर्ष वेळोवेळी उभा राहिला आहे,त्या संघर्षात सहभागी असणाऱ्या प्रत्येक मानवतावादी मूल्यांशी,समूहाशी बाबासाहेबांच नातं आहे.हे नातं त्यांनी त्यांच्या अफाट कष्टांतून,वाचनातून निर्माण केलं  आहे.जपलं आहे. 
पांडुरंग नंदराम भटकर

    उपेक्षित म्हणून आलेल्या अनुभवांनी बाबासाहेबांना खूप मोठा संघर्ष करायला सिद्ध केलं.त्याकाळातील त्यांचे सहकारी यांचीही भूमिका बाबासाहेबांच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची आहे.महाराष्ट्राच्या दलित चळवळीचा इतिहास बघितला तर बाबासाहेबांच्या या समकालीन सहकाऱ्यांची एक मोठी यादी समोर येते.त्यातील एक महत्वाचा नाव पांडुरंग नंदराम भटकर.बाबासाहेबांच्या या मानवतावादी चळवळीमध्ये पांडुरंग नंदराम भटकर यांच्या उल्लेख येतो तो ते मूकनायक या नियतकालिकाचे पहिले संपादक म्हणून.ते विदर्भातील विद्वान होते आणि त्यांनी एका ब्राह्मण स्त्रीशी विवाह केला होता एवढाच काय तो संदर्भ त्यांच्याबाबतीत वारंवार सापडतो.मात्र पांडुरंग नंदराम भटकर हे त्याकाळातील शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणाबाबत काम करणारं एक स्वतंत्र व्यक्तित्व होतं. डॉ .बाबासाहेब आंबेडकर आणि  पांडुरंग नंदराम भटकर यांच्यात एक नातं आहे,सख्य आहे.हे नातं आणि सख्य आजन्म टिकलेलं आहे. बाबासाहेबांचा शैक्षणिक संघर्ष,बाबासाहेबांच्या नेतृत्वाचा उदय,शाहू महाराज यांचे कार्य,विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य, तत्कालीन राजकीय घडामोडी,उपेक्षित विशेषतः महार समाजात चालू असलेल्या राजकीय घडामोडी,उपेक्षित समाजाला त्याकाळात शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष,बाबासाहेबांवरील बौद्ध धर्माचा प्रभाव,त्यांची धर्मांतराची चळवळ,संविधाननिर्मितीचे बाबासाहेबांचे कार्य या सर्व बाबींचे विश्लेषण करत असताना पांडुरंग नंदराम भटकर याचं बाबासाहेबांना समविचारी असणारं एक संयत व्यक्तिमत्व समोर येतं.
    पांडुरंग नंदराम भटकर यांचा जन्म १८९० सालचा. म्हणजे बरोबर बाबासाहेबांच्या जन्माच्या एक वर्ष आधी त्यांचा जन्म झाला.वडील शेतकरी.वतनाची दहा एकर शेती त्यांच्याकेडे होती.एक भाऊ सैनिकी सेवेत .महार जातीतील मुलांना शिक्षण घेणे यासाठी प्रतिकूल असणारा हा काळ.याकाळात त्यांनी वडिलांच्या आणि भावाच्या प्रेरणेने अकोल्यातील सरकारी शाळेमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .दहावीचे शिक्षण त्यांनी चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण केले.दहावीतच त्यांना संस्कृत हा विषय चांगल्या प्रकारे अवगत होता.पुण्या -मुंबईत त्याकाळात संस्कृतमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी फेलोशिप मिळत असे.परंतु जातीने महार असणे ही बाब बरोबर त्यांच्या आडवी येणे क्रमप्राप्त होते.परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी पुणे गाठले आणि त्यावेळच्या नामांकित अश्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.या कॉलेजमधून ते १९०८ साली इंटरएमिजिएट (पदवीपूर्व शिक्षण) झाले.काही संदर्भ त्यांचे प्राथमिक शिक्षण हे अकोल्यात झाले असे आहेत तर काही संदर्भात ते पुण्यातच दहावी झाले असे आढळते. खरे तर १९१० पर्यंतचा काळ हा केवळ उपेक्षितांनी भोगण्याचा काळ होता.फार पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबाबत फार मोठे काम केले होते.परंतु त्यांचे हे प्रयत्न केळीवेळीसारख्या छोट्याशा गावापर्यंत पोहचण्याची शक्यता फार कमी होती.महार जातीतील लोकांना केवळ लष्करात नोकरी करणे एवढा एक पर्याय होता.शाहू महाराजांना वेदोक्त प्रकारानंतर अस्पृश्यांच्या दुःखाची फार मोठी जाणीव झाली.तो हाच काळ होता .१९०९ साली मोर्ले मिन्टों सुधारणांनी अनेकजातींना राजकीय अधिकाराबाबत  प्रतिनिधित्वाचे रस्ते खुले केले. याच काळात बाबासाहेब शिक्षणासाठी अपार कष्ट घेत होते.अखिल अस्पृश्य समाजाला बाबासाहेब नावाच्या सूर्याची तेव्हा जाणीवही नव्हती.हा योगायोगच म्हणावा लागेल कि बाबासाहेबांचे वडील हे लष्करात होते आणि पांडुरंग भटकर यांचे भाऊही लष्करात होते .त्यामुळे शिक्षण घेवून पुढे जाण्याची प्रेरणा म्हणा वा मदत त्यांना मिळाली होती.हिरा बनसोडे आणि शिवराम जानबा कांबळे यांसारखे काही लोक समाजाच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम करत होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) ही संस्था अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची उन्नती करण्याचे कार्य करण्यासाठी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी स्थापन केली होती १९०९ साली पांडुरंग नंदराम भटकर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संपर्कात  आले.    पुण्यासारख्या विद्येच्या नगरात राहून प्राकृत ,संस्कृत ,मराठी आणि इंग्रजी या भाषांमधून  शिक्षण प्राप्त करणे हे खूप कष्टसाध्य काम होते.विसाव्या शतकाच्या प्रारंभी गावखेड्यातून गेलेल्या एका तरुणाने पुणे आणि मुंबई सारख्या वातावरणात मिसळणे आणि अभ्यास करून पुढे येणे ही त्याकाळाच्या मानाने खूप मोठी गोष्ट होती.पांडुरंग भटकर हे पुण्यात असताना त्यांचा प्राकृत भाषेशी संबंध आला.त्यात पाली भाषा ही त्यांना अधिक जवळची.त्याकाळात पुण्यात संस्कृत अध्ययन आणि अध्यापन केले जाते हे सर्वश्रुत होते आणि आहे.परंतु एक गोष्ट महाराष्ट्रातील आणि भारतातील विद्वानांच्या लक्षात आली नाही किंवा हेतुपुरस्सर येवू दिली नाही आणि ती म्हणजे पुण्यात बौद्ध धर्माचा खूप  मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जात होता आणि आजही तो केला जातो.तिबेट आणि चीनमधील बौद्ध माठ सोडले तर भारतात कुठेही नसतील एवढी बौद्ध साहित्याची हस्तलिखिते पुण्याच्या भांडारकर संस्थेकडे आहेत.त्याकाळात पांडुरंग नंदराम भटकर याच वातावरणात वावरत होते. बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाकडे त्यांचा विशेष कल होता आणि त्याबाबतीत त्यांचे बरेचशे वाचन चालू होते.मूकनायक या नियतकालिकाच्या संपादकपदी यांची नेमणूक करण्याआधी त्यांची पुणे मुंबई परिसरात विदर्भातील विद्वान अशीच ख्याती निर्माण झाली होती. आणि त्यांची ही विद्वत्ता त्यांच्या चौफेर वाचनातून त्यांना प्राप्त झाली होती ज्यात बौद्ध साहित्याच्या वाचनाचा भाग अधिक होता.बौद्ध साहित्य आणि त्याकाळातील सामाजिक सुधारणा हा पांडुरंग नंदराम भटकर यांच्या आस्थेचा विषय होता.१९०६ पासून महर्षी शिंदे बुद्धजयंती साजरी करीत असत. बंगाली विश्वकोशाचे संपादक बाबू नागेन्द्रनाथ बसू यांनी १९११ मध्ये आधुनिक बौद्धधर्म आणि त्याचे ओरिसातील अनुयायी  या पुस्तकाचा संदर्भ घेवून त्याच काळात महर्षी शिंदे बौद्धधर्माचा अभ्यास करत होते. ही बाब भटकर यांच्याही  निष्ठेची होती.रा.गो. भांडारकर हे त्याकाळातील संस्कृत पंडित; परंतु पाली साहित्याचा, बौद्ध धर्माचा त्यांचा गाढा अभ्यास होता.मराठीतील संतसाहित्य याबद्दलही ते तळमळीने बोलत असत.अनेकदा पांडुरंग नंदराम भटकर यांनी पुण्यात भांडारकरांचे संतसाहित्य आणि बौद्ध धर्म याबद्दलचे विचार ऐकले होते.संत तुकाराम आणि संत चोखामेळा यांच्या अभंगाबद्दल भटकर यांना विशेष ओढ.तेथूनच त्यांची सामाजिक दृष्टी अधिक प्रगल्भ झाली होती.
    याच काळात त्यांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यास अपयश आले होते.परंतु मोठ्या जिद्दीने त्यांनी पुन्हा अभ्यास करून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुण्यात विद्यार्थ्यांना संस्कृतची फेलोशिप मिळणे ही जशी त्याकाळातील गौरवाची बाब समजली जाई. त्याचकाळात उपेक्षित वर्गातून आलेल्या मुलांसाठी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड हे शिक्षणासाठी फेलेशीप देत असत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही फेलोशिप प्राप्त करून नुकतेच विदेशातून आलेले होते .याच प्रकारची फेलोशिप पांडुरंग नंदराम भटकर यांनाही बडोद्यांच्या रांजांकडून मिळाली होती.आणि ही फार मोठ्या गौरवाची बाब होती. याकामात त्यांना महर्षी विठ्ठल रामजी  शिंदे यांनी त्यांची मदत केली होती. शिक्षण घेत असताना आपल्या अवती भवतीच्या समाजाविषयी त्याच्या विकासाविषयीची भावना पांडुरंग भटकर यांच्या मध्ये विकसित होत होती.
        १९१७ साली भारत मंत्री मोंटेग्यु भारतात राजकीय सुधारणा देण्यासाठी साक्ष घेत होते त्यावेळी डिप्रेस इंडिया असोसिएशन ने अस्पृश्य समाजाच्या अधिकारासाठी निवेदन दिले होते.त्यात पांडुरंग नंदराम भटकर यांचा पुढाकार होता .(१९२२ मध्ये हीच sabha नागपूरला स्थापन करण्यात आला .तिची कार्यव्याप्ती मध्य प्रांतापुरती मर्यादित होती ,यामध्ये भटकर यांनी सदस्य म्हणून काम पहिले.)    
    सन १९१८ मध्ये नामदार विठ्ठलभाई पटेल यांनी मिश्र विवाहाचे विधेयक मध्यवर्ती विधिमंडळात विचारार्थ मांडले होते.त्याला सर्व पक्षातील प्रतिगामी ब्राह्मण नेत्यांनी ,विचारवंतानी विरोध केला होता.त्या विरोधाचे अग्रणी लोकमान्य टिळक आणि शंकराचार्य कुर्तकोटी होते.या विधेयकाला छत्रपती शाहू महाराज यांनी पाठिंबा दिला होता.या विधेयकाच्या समर्थनार्थ पांडुरंग नंदराम भटकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.१९१९ साली भायखळा मुंबई येथे याच विधेयकासंदर्भात सोमवंशीय निराश्रित सुधारक मंडळ यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. मिश्रविवाह विधेयकाला पाठींबा देणे,अस्पृश्य समाजातील मुलांना मोफत आणि सक्तीने प्राथमिक शिक्षण देणे , अस्पृश्य मुलांना शिक्षकाच्या नोकऱ्या देणे,अस्पृशता मानू नये आणि अस्पृश्यांना नागरिकत्वाचे हक्क समानतेने मिळावे हे सर्व मुद्दे पांडुरंग भटकर यांनी सभेद्वारे सरकारसमोर मांडले.ही फार मोठी गोष्ट होती.त्यामुळे डॉ.आंबेडकरांच्या आधी या प्रकारची भूमिका घेणाऱ्यांमध्ये पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव अग्रणी आहे. तेथूनच बाबासाहेब आणि पांडुरंग नंदराम भटकर यांचे एक समविचारी नाते तयार झाल्याचे लक्षात येते.विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आश्रमातील वेणूताई या धर्माने ब्राह्मण असणाऱ्या विधवेशी त्यांनी विवाह केला होता.ही बाब त्यांचे विचार आणि त्यांचे कर्तुत्व त्यांच्यातील एकवाक्यता दर्शविते.   
    साउथबरो कमिशन आणि त्यासंदर्भात बाबासाहेबांनी अतिशय जागरूकपणे अस्पृश्यांच्या संदर्भात केलेल्या कार्यामुळे तमाम ब्रिटीश भारतातील वंचित आणि दलित समाजात बाबासाहेब नावाचे मोठे नेतृत्व उभे झाले. छत्रपती शाहू महाराज यांनीही बाबासाहेबांच्या ह्या नेतृत्वाला मान्यता दिली होती. तो काळ १९१८-१९१९ चा. या काळात राजकीय आणि सामाजिक विषयावर लेखन चिंतन करणारे अनेक नियतकालिके अस्तित्वात होती .परंतु हिनदिन समाजाबद्दल लेखन करणारे एकही नियतकालिक नव्हते.या सर्व परीस्थितीत एक नियतकालिक असावे यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घेतला आणि मूकनायक ची सुरुवात झाली.या कार्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली.दत्तोजी पवार यांनी बाबासाहेब आणि शाहू महाराज यांची या संदर्भात मदत केल्याचे उल्लेख सापडतात. ही एक ऐतिहासिक पोकळीही असू शकते कि मूकनायकच्या आधीच्या घडामोडीत पांडुरंग भटकरांचे कुठेही नाव येवू नये.खरे तर साउथबरो कमिशन पासून अस्पृश्यांची जी काही चळवळ बाबासाहेबांच्या नेतृत्वात उभी राहत होती त्यात पांडुरंग नंदराम भटकर यांचा कार्यशील सहभाग राहिला आहे.१९१६-१९१७ या काही वर्षांपासून निमित्तानिमित्ताने बाबासाहेब आणि पांडुरंग भटकर यांच्या भेटी झालेल्या आहेत.महर्षी शिंदे यांनी पुण्याला अहिल्याश्रम बांधला होता.बाबासाहेब पुण्यात आले कि या आश्रमात उतरत असत.त्याकाळात पांडुरंग भटकर याच आश्रमात राहत असत.ज्या विधवा ब्राह्मण मुलीशी भटकर यांनी लग्न केले होते ती याच आश्रमात राहत होती. बौद्ध धर्म हे एक निमित्त घेवून महर्षी शिंदे आणि बाबासाहेब यांच्या चर्चा होत असत .या चर्चेमध्ये भटकर यांचाही सहभाग असे.येथूनच बाबासाहेब आणि पांडुरंग भटकर यांचा स्नेह जुळला होता. शिवाय पांडुरंग नंदराम  भटकर यांचा  साहित्याचा अभ्यास त्यातही प्राकृत साहित्याचा,बौद्ध साहित्याचा अभ्यास यावरून बाबासाहेबांच्या मनात भटकर यांच्याबद्दल अपार आदर होता आणि त्यांच्याशी अनेकवार झालेल्या चर्चेतूनच बाबासाहेबांनी मूकनायकच्या संपादनाची जबाबदारी भटकर यांच्यावर सोपविली . प्रारंभी भटकर यांना ही जबाबदारी देण्यासंदर्भात काही कार्यकर्त्यांकडून विरोध दर्शविण्यात आला.कारण एकच की त्यांनी ब्राहमण जातीच्या मुलीशी लग्न केले होते.जातीअंताकडे जाणारी ही चळवळ तिच्या प्रारंभीच अशा पद्धतीने जातीप्रश्नाने ग्रासलेली होती.बाबासाहेब यांनीच याबाबत पुढाकार घेतला आणि विरोधकांना भटकरांचे मोठेपण पटवून दिले.बाबासाहेब नावाचा तेजस्वी माणूस एखाद्या माणसाचे मोठेपण विनाकारण पटवून देणे शक्य नाही. पांडुरंग नंदराम भटकर यांनी मूकनायकची जबाबदारी घेतली. बाबासाहेब सीडनेहम कॉलेजला नोकरीला असल्यामुळे त्यांना संपादक म्हणून काम करता येत नव्हते .शिवाय शिक्षणासाठी त्यांना त्याच काळात अमेरिकेला जायचे होते .ह्या बाबी लक्षात घेवून मूकनायकच्या संपादनाची जबाबदारी भटकर यांच्यावर आली .इतिहासकारांनी मूकनायक मधले बाबासाहेबांचे कार्य कुठले आणि संपादकाचे कार्य कुठले याचे काही तपशील दिले आहेत. काकगर्जना हा पांडुरंग नंदराम भटकर यांच्या संपादकत्वाखाली निघालेला एक विशेष अंक.मानवी उत्थानाच्या संदर्भात जो काही प्रश्न असेल त्याला बाबासाहेबांनी स्पर्श केला आहे.अंकातील अग्रलेख सोडला तर स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल पांडुरंग भटकर यांनी लिहिले आहे. इतिहासात हिंदुकोड बिल म्हणून स्त्रीस्वातंत्र्याचा जो ऐवज आहे त्याला तोड नाही.आणि आधीचा इतिहास बघितला तर राजाराम मोहन  रॉय ,ईश्वरचंद्र विद्यासागर ,महात्मा ज्योतिबा फुले या कर्त्या सुधारकांची  नावे घेतली जातात. वर्णव्यवस्थेच्या अत्यंत जाचक काळात पांडुरंग भटकर यांनी एका विधवेशी विवाह केला आहे ,एवढेच नाही तर ही विधवा धर्माने ब्राह्मण होती .त्यामुळे स्त्रीदास्य विमोचानाच्या लढाईत भटकर यांचाही लक्षणीय सहभाग होता हे विसरून चालणार नाही.
पुढील दोन वर्षात त्यांना अमरावती आणि नागपूर या आपल्या मातृप्रदेशाकडे जावून शैक्षणिक कार्य करायचे होते म्हणून त्यांनी संपादकत्व सोडले आणि ते अमरावतीला निघून आले.
    भारतीय राजकारणात कायदे मंडळात स्वतंत्र प्रतीनिधित्वाचे तत्व १९०९ च्या मोर्ले मिंटो सुधारणांमुळे आले.१९२० च्या मोंटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणामुळे हे अधिकार अधिक व्यापक झाले.अस्पृश्यांना मात्र यामध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळाले नव्हते.मात्र प्रांताच्या कायदेमंडळावर अस्प्रश्यांचे एक किंवा दोन प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकार मिळाले होते.मध्यप्रांत व वऱ्हाड या प्रांतातून कायदे मंडळावर अस्पृश्याचे चार प्रतिनिधी घ्यावयाचे होते.त्यापैकी दोन प्रतिनिधी मराठी विभागातून नियुक्त व्हावयाचे होते.शिफारस करण्यासाठी एक सभा दिनांक २१-११-२०१८ रोजी  नागपूरच्या संत्रा मार्केट मध्ये भरली .या सभेत पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव यावर निर्णय झाला होता .परंतु पांडुरंग भटकर यांचे नाव सरकारकडे गेले नाही.खरेतर माणूस अति महत्वाकांक्षी झाल कि तो नियमांना,माणसांनाजुमानत नाही.इथे पांडुरंग भटकर यांचे नाव येवू न देणे यामागे स्वार्थप्रेरित राजकारण कार्यरत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही न जुमानणारा एक वर्ग तेथे होता.पांडुरंग भटकर हे भिडस्त आणि संयमी त्यामुळे त्यांनी कुय्हालेही राजकारण केले नाही वा कुणावर दबाव आणला नाही.समाजासाठी आपले काम ते नेटाने करत राहले.
    मध्यप्रांत व वऱ्हाड महार परिषद १२ वे अधिवेशन मी १९२३ मध्ये थुगाव अमरावती येथे भरले .या परिषदेचे अध्यक्षपद पांडुरंग भटकर यांच्याकडे होते. २६-०४-१९२६ ला चोखामेळा बोर्डिंग नागपूरला अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस सभा आयोजित करण्यात आली होती . अस्पृश्य समाजासाठी विविध मार्गांनी ,विविध संस्थांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न चालविले होते ,या सर्व संस्थांचे एकीकरण व्हावे हा सभेचा उद्देश होता.या सभेसाठी पांडुरंग नंदराम भटकर यांनी विशेष पुढाकार घेतला ,कारण ते या मिशनचे अनेक वर्षापासुनचे कार्यकर्ते होते.
    नेहरू समिती , सायमन कमिशन आणि राउंडटेबल कॉन्फरन्स यासंदर्भात डॉ बाबासाहेबांनी केलेले कार्य येथून बाबासाहेबांच्या कामाला खऱ्या अर्थाने वेग आला.बाबासाहेबांच्या भूमिकेला,मताला येथून महत्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली.बाबासाहेबांच्या जागी राउंडटेबल कॉन्फरन्सला आपली वर्णी लागावी यासाठी कार्य करणारा एक आक्रमक कार्यकर्तावर्ग त्याकाळात निर्माण करण्याचे चालले होते.अखिल भारतीय अस्पृश्य परिषद १९३० जे पी निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली .गोलमेज परिषदेला गणेश गवई यांचे नाव जावे यासाठी येथे प्रयत्न करण्यात आले .मात्र या अधिवेशनात गवई यांच्या या मनसुब्याचा पांडुरंग नंदराम भटकर यांनी त्वरित निषेध केला. बाबासाहेबंवरील त्यांची निष्ठा आणि विश्वास येथून प्रकट होते.
 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आग्रहास्तव ८ आणि ९ ऑगस्ट रोजी दलित कॉंग्रेसच्या नावाखाली अखिल भारतीय परिषद नागपूरला बोलवण्याचे  निश्चित झाले .त्यानुसार नागपुरात ऑल इंडिया डीप्र्सेड क्लास्सेस कॉंग्रेस कॉन्फ्रन्स चे कार्यालय स्थापन करण्यात आले .या परिषदेची धुरा सांभाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वागत मंडळामध्ये पांडुरंग भटकर यांचा समावेश होता .
    इतिहासकारांनी पांडुरंग नंदराम भटकर यांचा उल्लेख बाबासाहेबांचे कट्टर पुरस्कर्ते असं केला आहे.त्यात शंका नाही.परंतु बाबासाहेबाबरोबर व्यक्तिविकास नावाचा जो काही भाग असतो त्यानुसार पांडुरंग भटकर हे स्वतंत्र अस्तिवाचे धनी होते.बाबासाहेब ज्या गतीने समाज उद्धाराच्या कार्यात पुढे गेले टी गती जगातल्या कोणत्याही नेत्याला अजूनही साधता आली नाही .मात्र अनेकांनी बाबासाहेबांच्या या गतीला पूरक आणि समांतर असे काम केले आहे त्यात पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव अग्रणी आहे.अस्पृश्यांना कायदेमंडळात स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे ही मागणी १९१० नंतरच्या काळापासूनची आहे.ज्या मागणीसाठी पांडुरंग भटकर यांनी वेळोवेळी सभांमधून आपले म्हणणे मांडले आहे.बाबासाहेबांनी येवले मुक्कामी बौद्धधर्माची दीक्षा घेण्याची घोषणा केली आणि त्याकाळातील हिंदू प्रतिगामी आणि विचारवंत अस्वस्थ झाले .अनेक ठिकाणी चर्चा झाल्या ,वाद झाले.बाबासाहेबांनी या विचारापासून परावृत्त व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले.बाबासाहेबांबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाची प्रलोभने देण्यात आली.या प्रलोभनाला अनेक कार्यकर्ते बळी पडले .मात्र पांडुरंग नंदराम भटकर यांनी सातत्याने बाबासाहेबांच्या निर्णयाचे विचारपूर्वक समर्थन केले.त्याकाळात अनेक व्यासपीठावरून भटकर यांनी बौद्धधर्म आणि धर्मांतर याविषयी बाबासाहेबांची बाजू मांडली.नागपूरला शंकराचार्य कुर्तकोटी यांनाही त्यांनी निरुत्तर केल्याचा प्रसंग आहे.
    बाबासाहेबांना जी एक मानवतावादी चळवळ उभी केली होती त्या चळवळीत अनेक विचारंची लोकं होती.एक वर्ग जो बाबासाहेबांना समकालीन होता,दुसरा वर्ग बाबासाहेबांच्या नेतृत्वाला सहाय्यभूत असं होता ,एक वर्ग हा बाबासाहेबांच्या चळवळीशी  समांतर राहून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहत होता,एक वर्ग बाबासाहेबांचे तत्वज्ञान मान्य करून बाबासाहेबांना देवत्व बहाल करणारा वर्ग होता.पांडुरंग नंदराम भटकर याचं कार्य हे बाबासाहेबांच्या प्रत्येक कृतीला सहाय्यभूत असं आहे. खरे तर भटकर बाबासाहेबांना समकालीन आहेत,परंतु जो विचार आपण बाळगतो तोच मानवतावादी विचार बाबासाहेबासारखा माणूस प्रत्यक्ष अंमलात आणतो आहे ,याठिकाणी भटकर बाबासाहेबांचे कट्टर समर्थक ठरतात. पांडुरंग नंदराम भटकर यांच्या कार्याची इतिहासाने भलेही सूक्ष्म अशी दाखल घेतली नसेल परंतु परंतु त्यांच्या कार्याचा गौरव हा मोठ्या स्तरावरून झाला आहे. अलिप्ततावादाची चळवळ उभारून जगत शांतता नदवी यासाठी प्रयत्न करणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना अनेकदा अनेक देशांतून भारतातील अस्पृश्यतेबद्दल विचारणा केली जात असे.त्यात नेहरू निराश व्हायचे .परंतु भारतात अस्पृश्यतेसाठी खूप काम इथल्या लोकांनी केलं आहे यासंदर्भात नेहरू बोलत असत .त्यात अनेक मान्यवरांची नवेही ते देत असत.नेहरूंनी संविधान समितीच्या भाषणामध्ये अस्पृश्यातेसाठी काम करणाऱ्या लोकांमध्ये रावबहादूर श्रीनिवासन ,वीररत्न देवदासजी,किसान फागु बनसोडे यांच्याबरोबर पांडुरंग नंदराम भटकर यांचे नाव घेतले आहे.(constituent assembly debates : official report volumes 11.) ही बाब तर अभिमानास्पद आहे याशिवायही पांडुरंग नंदराम भटकर याच्या आयुष्यातील महत्वाची घटना म्हणून तिचा उल्लेख करता येईल. बाबासाहेब आणि माईसाहेब नागपूरला दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी निघाले.स्टेजवर चढता चढता त्यांना पांडुरंग भटकर यांच्या आईने आवाज दिला.बाबासाहेबांनी ओळखलं आणि विचारलं साहेब कुठे आहेत. बाबासाहेबांची ही फार मोठी कृतज्ञताच आणि मोठेपण कि ते पांडुरंग भटकर यांना साहेब म्हणायचे. यापेक्षा अधिक कुठला मोठा ऐतिहासिक उल्लेख असेल. पांडुरंग भटकर हे निगर्वी नव्हते,महत्वाकांक्षी होते परंतु आक्रमक नव्हते.त्यांनी फार संयतपणे समाजासाठी कार्य केलं आहे आणि बाबासाहेबांना सहकार्य आणि साथ दिली आहे.
    नागपुरात विठ्ठल रामजी शिंदे यांचे एक वसतिगृह सुरु होते या वसतिगृहाचे संचालन त्यांनी शेवटपर्यंत सांभाळले.केवळ भौतिक संसाधनावर खर्च न करता प्रत्यक्ष दलित शोषित विद्यार्थ्यांसाठी खर्च व्हावा याबाबत ते आग्रही होते. जातीव्यवस्था ही मिश्र विवाहाने संपू शकतो हा त्यांचा विश्वास होता.अंबुबाई याच्यासोबत त्यांचा पहिला विवाह झाला होता .त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या .एक मुलगी पार्वताबाई आणि दुसरी शांताबाई.त्यांच्या शांताबाई या मुलीचे लग्नतत्कालीन महार जातीतील राष्ट्रीय कार्यकर्ते हेमचंद्र खांडेकर यांच्याशी झाले होते..१९३४ मध्ये ते अमरावतीला स्थायिक झाले. २४ मे १९६२ रोजी त्यांचा मृतू झाला.


डॉ.जगतानंद भटकर
सहा.संपादक
मराठी भाषा विभाग
महाराष्ट्र राज्य.

४ टिप्पण्या:

  1. खूप महत्वपूर्ण माहिती भटकर सर..
    आपला पिढीजात वारसा बुलंद आहे..

    उत्तर द्याहटवा
  2. आपण भटकर साहेबांच्या दोन मुलींची नावे सांगितली पण मुलाचे सांगितले नाही.त्यांचे नाव प्रभाकर होते. ते अमरावती येथून ' नव भिमज्योती ' साप्ताहिक चालवत असत. ते १९७६ नंतर बंद पडले. मी त्याचा वाचक होतो. मला ते गिफ्ट म्हणून येत असे.
    - अशोक थोरात.
    आपण भटकर साहेबांच्या दोन मुलींची नावे सांगितली पण मुलाचे सांगितले नाही.त्यांचे नाव प्रभाकर होते. ते अमरावती येथून ' नव भिमज्योती ' साप्ताहिक चालवत असत. ते १९७६ नंतर बंद पडले. मी त्याचा वाचक होतो. मला ते गिफ्ट म्हणून येत असे.
    - अशोक थोरात.
    अमरावती . अमरावती .

    उत्तर द्याहटवा

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट