ब्लॉग शोधा

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

कविता असते

कविता असते
चुरगाळलेल्या कागदावरची
खोडलेली अक्षरं वाचण्याचा
केविलवाणा प्रयत्न
किंवा त्याहीपेक्षा कविता असते
स्वतःला वेळोवेळी शून्याने गुणून
जगण्याचा द्वेषी उत्साह

कविता असते
तिचे सुंदर डोळे आपले फटके जोडे
तिचे गुलाबी ओठ आपलं रिकामं पोट
यामधली गंभीर तुलना
किंवा त्याहीपेक्षा कविता असते
तिच्याचसाठी मातीतूनही
मोती निपजण्याचा आत्मविश्वास

कविता असते
समोर रावण असतानाही पावन राहणाऱ्या
सीतेच्या मनातली निष्ठा
किंवा त्याहीपेक्षा कविता असते
अखिल संसर्गाचे आकांत पोटात घेणाऱ्या
सावित्रीच्या मनातली निष्ठा

कविता असते
घरातल्या पणतीला आश्रय मिळावा म्हणून
खणतीला जाणाऱ्या बापाच्या कुरपाळलेल्या
पायातली ताकद
किंवा त्याहीपेक्षा कविता असते
घरी सारं काही रांधून घेणाऱ्या
पण शिळीच भाकर बांधून नेणाऱ्या
मायच्या पोटातली कडूशार जिद्द

कविता असते
जे जे उत्तम ,महान्मंगल,पवित्र ते ते
किंवा त्यापेक्षा कविता असते
ईश्वराच्या जागेवर माणसाची प्राणप्रतिष्ठा करावी
यासाठी अविरत चालू असलेले
माणुसकीचे आंदोलन

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

खेळणी

 खेळणी

वारीच्या गर्दीत
बापाने खांद्यावर घेतलं मुलाला
वासुदेवाने नदी लोट्ल्यासारखी
त्याने सारली हिम्मतीने गर्दी
आणि ठेवले  तुकारामाच्या पालखीवर हात .
फिरवले मुलाच्या तोंडावरूनही.
मुलगा त्याच्या तालात गुंग
वारकरी त्यांच्या तालात गुंग .
पुन्हा आपली गर्दी सारून
बाप आला आपला मागे
मुलाला खांद्यावर घेवूनच .
आणि थांबला एका खेळण्याच्या दुकानासमोर
मुलासाठी .मुलाच्या आनंदासाठी .
मुलगा म्हणाला ,बाबा ही  खेळणी नको
मला बंदूक पाहिजे .
नाहीतर  चमकणारी तलवार द्या .
बाप म्हणाला नको ,नको
ही शिट्टी घे ,फुगा घे.
मुलगा म्हणाला नाही .
मला बंदुकच पाहिजे नाहीतर तलवार
नाहीतर हा भुताचा मास्क द्या.
बाप बघत राहिला मागे वळून  
तुकारामाची पालखी गर्दीत दिसेनाशी होत होती.

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट