ब्लॉग शोधा

शनिवार, २१ मे, २०२२

कहाणी

कहाणी
तासातासात आपण जीव पेरतो
त्या जीवाची ही कहाणी आहे शेवट नसलेली .
विंचू उतरवणाऱ्यापेक्षा चढवणारे अधिक असले
तरी एकातही भागून जातं
एवढाच एक उतारा असतो रोजच्या डसाडसीला ;
कारण गंज उचलावा गवताचा
त्या प्रत्येक गंजात असतोच एखादा विंचू.
नाही म्हटलं तरीही .
उभ्या शिंगाचं खुनशी डुक्कर
केव्हाही येवू शकतं आपली मांडी फाडायला
कोवळ्या अंगाची हरणं
कोवळे कोंभ हुंगून हुंगून खातात
काहीही करता येत नाही अशावेळी.
एखादी वीज सळसळत येतेचं
झाड फाडून अंगावर टराटर.
पाणी येत नाही वेळेवर
जीव उलायला येतो तरीही.
आला की डोळे पिवळे होतात
जगणं सडायला येतं हिरव्या निळ्या पिकाचं.
एवढं करूनच हातात पिक येतं
घरी न्यायचं झालं तर
मध्ये आडवी असतेचं पुराची नदी
आणि नदीत असतात निनावी मगरी चिडीचूप.

झळी

झळी


खुपदा झळी लागते, पावसाची.
हप्त्यावर काम करणाऱ्या मजुराला
अशावेळी सोडता येत नाही मालकाचं घर.
रस्ते पायफसणीचे झाले की
मजूर असतो मालकाच्या घरी.
बैल पाणी पीत नसला तरी
त्याच्यापुढे पाणी मांडावं लागतं.
शेण काढावं लागतं खरडून खरडून.
झाडलोट करावी लागते पुन्हापुन्हा.
मागच्या झळीत नीट ठेवलेलं
सगळं सामान पुन्हा नीट ठेवावं लागतं.
एकूण काय तर मालकाला दिसायला हवं
मजुराचे हात चालू आहेत ते.


कधी कधी किंवा नेहमी नेहमीच
मजुराची बायको आजारी असते.
मायच्या पोटात गोळा झालेला असतो.
सरकारी दवाखान्याच्या येरझाऱ्यापायी
मजूर मारतो एखाद दिवसाची च्याट
आणि होतो नंतर कामावर हजर.
मालकाला निमित्तच पाहिजे असतं फणफणण्याच.
एक दोन दिवसांच्या गैरहजेरीचा हिशोब म्हणून
मालक सणकन लगावतो मजुराच्या कानफडीत.
मजुराला काहीही करता येत नाही.
तो काढतो खरवडून खरवडून शेण पुन्हा
मांडतो बैलापुढे पाणी
इथे ठेवलेलं सामान पुन्हा तिथे ठेवतो.

सणसण करणारा कान घेवून घरी येतो.
मुलाला सांगतो की बाबा पुस्तक वाच.
मुलगा पुस्तक वाचत नाही.
आणि अशावेळी काहीबाही मनात येवूनही 
तो  फक्त पकडतो मुलाचे कान 
आणि बसवतो त्याला अभ्यासाला 
मुलगा खरडतो मग पाटीवर शब्द
लावतो अ ला अ आणि ब ला ब
मांडू पाहतो नीट बाराखडी.
तेव्हा मजूर लपवू शकत नाही
चेहऱ्यावर दाटून येणारं जोरदार समाधान
मालकाच्या कानफडात सणकन वाजवल्याचं.

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट