गायीला सोट आले की
वडील गायीला भरून आणायचे
मग गाय पोटुशी राहायची
काही दिवसातच वासराला जन्म द्यायची.
मग गायीचं वासरू
मग गायीच्या कोऱ्या दुधाचं खिरुज
मग गायीचं धारोष्ण दूध
मग गायीच्या दुधाचं दही
मग गायीच्या दुधाचं तूप
मग जीवन गाईमय व्हायचं
जीवन आईमय असतं तसं.
एखादवेळी गायीला सोट यायचे
आणि गाय गोठ्यातून निघून जायची
वडील नेसत्या कपड्यात
गायीला शोधायचे रानावनात
बिनचपलेने धावायचे नदीचे काठ
उमटलेल्या खुरामागे चालायचे दिनरात.
मुलीने घरून पळून जावं
आणि बापाने धुंडळावा सगळा अवकाश
असंच काहीतरी व्हायचं.
पण गाय सापडायची, सापडायची तिथे.
वडील गायीला घरी आणायचे
मग तेच दूध, दही, तूप आणि अधिक काही.
गायीचं हे बोकांडनं खपत नसे कुणाला
वडील असतात तिथेच ठाम की
गायीला सोट आले की
आपणच तिला भरून आणायचं.
गायीचं गाईपण आपण कधीच मान्य केलं नाही.
अनादिकाळापासून.
डॉ. जगतानंद भटकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा