आता आणखी एखाद्याही बाळाला
मारायच्या आधी, एक करा.
ज्या मातीत दाणे उगवून आले
ज्या दगडातून नद्यांना झरे फुटले
ज्याने तूम्ही तृषार्थ झालात
ती माती, ते झरे नष्ट करा.
फोडून काढा ते सगळे दगड,
ते स्तंभ, ते लेख, शिलालेख
ज्यावर लिहलाय तूम्ही
तुमचा तथाकथित इतिहास.
खचवूनन टाका त्या सर्व गुहा
जेथे तूम्ही पहिला उजेड अनुभवलाय.
सगळी तत्त्व खोटी असल्याची द्वाही पिटा.
झाडाच्या सावलीला बोल लावा.
बुध्दाचे बोधिसत्व, गोवर्धनाचा आधार
ख्रिस्ताचे शुभवर्तमान आणि पैगंबराचे उपवास
हे सगळं दांभिक असल्याचं जाहीर करा.
आणि देव रस्त्यावर ठेवा बेवारश्यासारखे.
घरात काही ग्रंथ असतील
गुंडाळून ठेवलेले
ते जवळच्या कोणत्याही नदीत बुडवून टाका
पुन्हा वर येऊ नयेत या व्यवस्थेसह.
मन, मान आणि मेंदू
असं काही अस्तित्वातच नाही
मनगट तेवढं आहे हे पटवून द्या.
ते पि्रॅमिड्स, ते लेण्या,
ते ताजमहाल,ते युनिटी, लिबर्टी
इकव्यालिटीचे स्टॅचू
सगळं उध्वस्त करा.
एक एक व्यक्ती नष्ट करा
जो बोट दाखवतोय, दिशा दाखवतोय.
आदम आणि इव्ह,
प्रेम आणि स्पर्श
हे थोतांड असल्याचं सिद्ध करा.
आता आणखी एखाद्याही बाळाला
मारायच्या आधी, एक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा