शेवटी सुटका नाही माणसाची माणसापासून.
ब्लॉग शोधा
गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३
माझ्या लहानगे मुली
माझ्या लहानगे मुली
डावावर लावायचे
नाहीतर वस्त्रहरण करायचे
वनवासात पाठवायचे
नाहीतर अपहरण करायचे
वेदनांच्या अपरिहार्य बेसरबिंदीने
टोचले जाऊ नये तुझे नाक
यासाठी मी टाळत फिरतो
अवघ्या सोनारगल्ल्या.
आताशा तुझे इवलुशे पाय
जिथे पडतात तिथे,
मी अंथरतो माझे काळिज
मोकळा श्वास घेता यावा म्हणून
तुला जोजावत राहतो
माझ्या एयरकंडीशनर कुशीत.
माझे लहानगे मुली
मी जीवाचे कान केलेत तुझ्या जन्मापासून
तुझ्यातली गार्गी,सावित्री,रमाई ऎकायला
अवती भोवतीच्या मुन्नी ,लैला
अन् कुण्या शालु अनारकलीच्या
गोंगाटातही.
कुठला बाप काढतो विकायला
स्वतःच्याच मुलीला किंवा करतो खूनच तिचा?
कुठले मायबाप संगनमत करून
जन्मापूर्वीच करतात कत्तल तिची?
आता तर तपासूनच पहावी
लागेल माणसाची आदिमता.
उपटून फेकावेच लागतील
बाप नावाच्या संस्कृतीने
माणसात ओतलेले जनावरांचे जिन्स.
माझे लहानगे मुली
पृथ्वीच्या पोटात सामावल्याने
तुझी क्षमता सिद्ध होणार नाहीये
तुला यावचं लागेल रस्त्यावर
सावित्रीसारखं शेण झेलत
अखिल संसर्गाचे आकांत पोटात घेऊन.
बोबडं का होईना तुला शिकावं लागेल
मुक्ता साळवेसारखं बोलायला.
माझे लहानगे मुली
तुला सज्जच व्हावं लागेल आता
तुझ्या इवल्याशा बोटावर
ही अवघी पृथ्वी तोलायला!!
संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश
मनुष्यजातीच्या मुखांतून जे जे म्हणून सार्थ व संपूर्ण विधान शब्दरूपाने भूत, वर्तमान व भविष्यकाली बाहेर पडले, तें तें सर्व साहित्य होय अशी इतिहासाचार्य राजवाडे यांनी साहित्याची व्याख्या केली आहे. हा सगळा साहित्य व्यवहार समाजगत असतो. समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे एक मूल्याधिष्ठित चित्र साहित्य व्यवहारातून प्रकट होते. ही बाब डोळ्यासमोर ठेवून प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या मराठी साहित्याचा परिचय करून द्यावा या दृष्टीने प्रस्तुत मराठी वाङ्मयकोश या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. साहित्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक यांना डोळ्यासमोर ठेवून या कोशाचा आराखडा तयार करण्यात आला. मराठी साहित्यात लक्षणीय असणारे सर्व ग्रंथकार, ग्रंथ, पंथ, संप्रदाय, चळवळी, नियतकालिके, साहित्यसंस्था, प्रकाशनसंस्था, मुद्रक, वाङ्मयीन प्रवाह, समीक्षेतील संज्ञा इत्यादी विषयीच्या नोंदी या कोशात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सदानंद भटकळ, जया दडकर, प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके या मातब्बर मराठी साहित्यविषयक तज्ञ मंडळींनी या कोशाला आकार दिला आहे. खरे तर या कोशांच्या निर्मितीमागे एक दु:खार्थ आणि भावनिक प्रेरणा आहे. या वाङ्मयकोशाची मूळ संकल्पना भटकळ फौंडेशन या मराठीतील प्रतिथयश प्रकाशन संस्थेचे विश्वस्त सदानंद भटकळ यांची. साधारणतः १९४० पासून प्रकाशन व्यवसायात कार्य करणारे सदानंद भटकळ यांनी ग.रा.भटकळ यांच्या जन्मशताब्दी निमित्त या प्रकल्पाची आयोजना केली. १९९५-९६ या साली हा प्रकल्प सुरु झाला. मात्र त्याच काळात भटकळ यांना कर्करोगाचे निदान झाले. आलेल्या परिस्थितीशी सामना करत त्यांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केली आणि आपल्याला जो ही जीवितकाळ मिळेल त्या काळात संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश या प्रकल्प पूर्ण करावा असे ठरविले. याच प्रेरणेतून हा प्रकल्प पूर्ण झाला. श्रीमती जया दडकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली. संपादक ,लेखक आणि समीक्षक म्हणून प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके यांनी या कोशाची कार्यपूर्ती केली. प्रभा गणोरकर आणि वसंत आबाजी डहाके हे दोघेही मराठीच नव्हे तर भारतीय आणि जागतिक साहित्याचे प्रगाढ अभ्यासक. दोघांचाही मराठी साहित्यातील प्रत्येक सूक्ष्मतम घटकांचा अभ्यास असल्याने त्यांनी या कोशाला एक कष्टसाध्य अशी सर्वसमावेशकता दिली आहे. ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशा’चे हे प्रचंड काम तीन खंडांत पुरे केले गेले आहे. मराठी भाषा आणि साहित्याच्या आरंभापासून इ.स. १९२० पर्यंतच्या कालखंडातील साहित्यविषयक नोंदींचा प्रथम खंड आणि इ.स. १९२० नंतरच्या आजपर्यंतच्या साहित्याविषयीच्या नोंदींचा दुसरा खंड आणि वाङ्मयसमीक्षा-संज्ञाचा तिसरा खंड असे या कोशाचे स्वरूप आहे. वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश या खंडाचा यथावकाश स्वतंत्र परिचय करून देईल. या कोशाच्या निर्मितीसाठी ऑक्सफर्ड कम्पनिजन टु इंग्लिश लिटरेचर' आणि 'केंब्रिज गाईड टु लिटरेचर इन इंग्लिश हे दोन ग्रंथ नजरेसमोर होते. मराठी वाङ्मयकोश खंड पहिला मराठी ग्रंथकार इ.स. १०५०-१८५७ या शीर्षकाचा श्री. गं. दे. खानोलकर संपादित वाङ्मयकोश महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाने १९७७ साली प्रकाशित केला होता. या कोशात केवळ ग्रंथकारांविषयीच्या नोंदी आहेत. त्यामुळे वाङ्मय इतिहास आणि स्वरूपाच्या दृष्टीने या कोशाला मर्यादा होत्या. खानोलकर, वि. ल. भावे, पांगारकर, अ. ना. देशपांडे या प्रभूतिनी मराठी साहित्याचा समग्र इतिहास लिहिला आहे. मात्र त्याचा व्याप केवळ लक्षात घेवून संक्षिप्तपणे वाचकांना हा समग्र इतिहास देता यावा हा हेतू ठेवून या कोशाच्या पहिल्या दोन खंडात मराठी साहित्याचे समग्र चित्र रेखाटलेले आहे.
लेखन, मुद्रण, प्रकाशन आणि वितरण या वाङ्मयव्यवहारातल्या चार पायऱ्या आहेत. चारही पायऱ्यांशी निगडित अशा व्यक्ती आणि संस्थांविषयीच्या नोंदी या कोशात घेतल्या गेल्या आहेत. साहित्यविश्वाच्या पर्यावरणात प्रत्येकाचे काही एक स्थान असते त्यामुळे मराठी वाङ्मयव्यवहाराचे यथार्थ आकलन होण्यासाठी मराठीतल्या एकूण एक लेखनाची नोंद या कोशात घेण्यात आली आहे. प्रत्येक नोंद ही परिपूर्ण असली आहे;परंतु तिचा विस्तार फार नाही, आवश्यक त्या सर्व गोष्टी येथे दिल्या आहेत. त्या त्या ग्रंथकाराचे अथवा साहित्यकृतीचे व्यक्तिमत्त्व मूर्त होईल एवढा मजकूर देवून एक संक्षिप्तता येथे जपली आहे.
दोन्ही खंडांना आमुख म्हणून विस्तृत आणि प्रदीर्घ प्रस्तावना वसंत आबाजी डहाके यांनी लिहिल्या आहेत. मराठी साहित्याचे एक प्रकट आणि विश्लेषक चित्र या प्रस्तावना रेखाटतात. मराठी साहित्य आणि इतिहास या संदर्भात संदर्भ मर्यादा हा एक मोठा विषय आहे. मूळ प्रत, लेखकाचे छायाचित्र अशा मर्यादा टाळून हा कोश अधिकाधिक सचित्र करण्यात आला आहे. अनेक ग्रंथकारांची छायाचित्रे या कोशात पाहायला मिळतात. मराठी साहित्य आणि संस्कृतीचा एक कोशात्म असा परिपूर्ण लेखाजोखा या कोशातून मांडला आहे.
सदानंद भटकळ यांच्या कर्करोगाच्या निदानाने या कोशाच्या निर्मितीला एक भावनिक अंग होते. या कोशाच्या निर्मितीच्या ओढीने त्यांनी त्याकाळात कर्करोगावर मात केली होती. प्रभा गणोरकर या फार तटस्थ अभ्यासक. कोशाचे कार्य गांभीर्याने आणि सखोल संदर्भ शोधून करायचे या भूमिकेवर त्या ठाम होत्या. सु. रा.चुनेकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोश अभ्यासक. त्यांनी या कोश कार्याबद्दल सकारात्मक मत दिले आहे.
मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या आणि जिज्ञासू यांच्यासाठी संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश या कोशाचे हे पहिले दोन खंड अत्यंत मोलाचे आहेत.
भारतीय संस्कृतिकोश
भारतीय संस्कृतिकोश
भारताची संस्कृती ही विविधांगी आहे. काळ, प्रदेश, भाषा, साहित्य अशा अनेक घटकांनी ती पृथगात्म झाली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रारंभकाळातच या बहुआयामी संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे यासाठी काही संस्थात्मक प्रयत्न करण्यात आले. साहित्य अकादमी, नाट्य अकादमी, ललितकला अकादमी विविध कलासंस्था भारत सरकारने त्यासाठी निर्माण केल्या. आकाराने विशाल मात्र निरनिराळ्या संस्कृतीबद्ध आचारांनी भारतातील असंख्य समूह आपले जीवनयापन करत आहेत. मानव हा सभोवतीच्या निसर्गात किंवा निसर्गातल्या पदार्थांत आपल्या जीवनाला अनुकूल आणि उपयुक्त असे बदल करून किंवा प्रसंगी त्यांच्यावर इष्ट ते संस्कार करून आपली जीवितयात्रा चालवत असतो. अशी इरावती कर्वे यांनी संस्कृतीची व्याख्या केली आहे. मानव जीवनाच्या अनुकूलतेकडे सातत्याने प्रवास करत आला आहे. या प्रवासाला त्याच्या स्वभाव, प्रदेश, निसर्ग, आचारविचार, तत्त्वज्ञान, कार्य अशा अनेक घटकांनी व्यापलेले असते. हा व्याप अगदी प्राचीन काळापासून ते आज आतापर्यंत कार्यरत असतो. भारतीय संस्कृतीचे असे व्यामिश्र तरीही एकसंध असे चित्र कोशात शब्दबद्ध करावे या हेतूने भारतीय संस्कृतीकोशाची निर्मिती करण्यात आली आहे. शीर्षकानुसार भारतीय संस्कृतीतील एकूण एक घटकांची सारबद्ध आणि ससंदर्भ माहिती या कोशात विविध नोंदीतून देण्यात आली आहे.
सांस्कृतिक प्रयत्न म्हणून या कोशाच्या निर्मितीसाठी १९५७ साली भारतीय संस्कृतीकोश मंडळाची स्थापना करण्यात आली. कोशकार्यात मुलभूत कार्य करणारे तज्ञ या मंडळाचे संस्थापक सभासद होते. त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, डॉ. रा. ना. दांडेकर, श्री. अ. ह. लिमयें, श्री. शं. वा. किर्लोस्कर,श्री. बा. वा. पोतदार, प्रा. न. र. फाटक, श्रीमती दुर्गा भागवत, श्री. वि. पु. भागवत,प्रा. गोवर्धन पारीख, श्री. काशीनाथ नायक, श्री. चि. ग. कर्वे, बा. ग. जगताप,श्री. सि. ग. फडके, श्री. चि. श्री. नातू, श्री. जयंतराव टिळक, डॉ. ग. वि. देसाई, पं. महादेवशास्त्री जोशी, सौ. पद्मजा होडारकर अशा मान्यवरांचा समावेश होता. संस्कृत, पाली, हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, तेलुगु, तमिळ, इ. देशी भाषांतील आणि इंग्रजी आणि परदेशी भाषांतील भारतीय संस्कृति-विषयक ग्रंथसंपत्तीचे अवलोकन करून त्या आधारे 'भारतीय संस्कृतिकोश' या नांवाने भारतीय संस्कृतीचा व्यापक आणि तपशीलवार ज्ञानकोश मराठी व हिंदी या दोन्ही भाषांत तयार करणे, हा या मंडळाचा उद्देश होता. केवळ सांस्कृतिक विषयांना वाहिलेला एक तपशीलवार व व्यापक कोश निर्माण करण्याचा उद्देश असल्याने हे महत्वाचे कार्य ठरले.
संघर्ष, समन्वय, सामंजस्य आणि एकात्मता या क्रमाने भारतीय संस्कृती आकारास आली आहे. भारतात वास्तव्य करणाच्या जातीजमातींनी देश-काल-परिस्थितीला धरून आपापल्या सांस्कृतिक आविष्कारांच्या विविध पद्धती निर्माण केल्या आहेत. धर्म, पंथ आचार, विचार, श्रद्धा-संकेत, पूजास्थाने, देवता, यात्रा, उत्सव, व्रते, पर्वे, साहित्य, नृत्य, नाटघ, शिल्प चित्र, त्याचप्रमाणे सामाजिक आणि कौटुंबिक चालीरीती, अशा असंख्य प्रकारांनी या विविधतेने विस्तृत रूप धारण केले आहे. भारतीय संस्कृतीचे हे विस्तृत रूप या कोशात पहावयाला मिळते.
संस्कृतीची निर्मिति, तिचा संचय व एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, दुसरींतून तिसरीत अशी तिची संक्रांती होत जाणे म्हणजे संस्कृतीची परंपरा होय. संस्कृती ही एका व्यक्तीची नसून ती समाजाची असते. व्यक्तीचें जीवन मर्यादित व अत्यल्प असतें; तर समाजाचे जीवन प्रदीर्घ व मोठ्या प्रदेशावर विस्तारलेलें असतें. संस्कृती ही व्यक्तीच्या आयुष्याची दिशा निश्चित करते; तर व्यक्ति युगधर्माला अर्थात् देशकालाला अनुसरून संस्कृतीचा प्रवाह बदलीत असते. हवा, पाणी, सूर्यप्रकाश या गोष्टी जितक्या सहजतेने मानवाच्या जीवनांत सोबत करतात, तितक्याच सहजपणे संस्कृतिही मानवाचे अंतर्बाह्य जीवन व्यापून राहते. या उदात्त विचारांना समोर ठेवून भारतीय संस्कृतीचे संपूर्ण संकल्पनाचित्र या कोशात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय संकृतिकोशाचा पहिला खंड १९६२ मध्ये प्रकाशित करण्यात आला. या कोशाचे एकूण दहा खंड प्रकाशित झाले असून दहावा खंड १९७९ मध्ये प्रकाशित झाला आहे. या दहा खंडांमध्ये एकूण १२७१९ एवढ्या नोंदी प्रकाशित झाल्या आहेत. त्या १४० घटक विषयात विभागल्या आहेत. नोंदीचे स्वरूप सूक्ष्म,दीर्घ आणि व्याप्तीलेख या स्वरूपाचे आहे. वीस वर्ष या विस्तृत काळामध्ये या कोशाच्या निर्मितीचे कार्य चालू होते. धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास अशा विषयांशी संस्कृतीचा सातत्यस्पर्श असल्याने या कोशातील नोंदी ह्या परिपूर्ण आणि आश्वासक आहेत. या कोशाच्या द्वारे भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचें, प्रवाहांचें आणि आविष्क साररूप पण सर्वांगीण दर्शन वाचकांना आणि जिज्ञासूंना घडावे, हेच या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
त्यास अनुसरूनप्रस्तुत कोशांत पुढील घटकांची तपशीलवार माहिती दिली आहे- विषय पुढीलप्रमाणे - यज्ञसंस्था, वैदिक संस्कार, प्रांतीय व अखिल भारतीय सण व उत्सव, तीर्थे, क्षेत्र व सरोवरें, नद्यांचं माहात्म्य व त्यांचा परिचय, भारतांतलीं सुप्रसिद्ध देवस्थानें, स्मार्त, पौराण इ. सर्व प्रकारचीं प्रायश्चित्तें, अग्नि, जल इ, विविध प्रकारचीं दिव्यें, देव-देवतांच्या पूजा आणि बलिदानें,शुभाशुभ मुहूर्त, पौराणिक व्रतें, अरिष्टनिवारणार्थ सर्व प्रकारची भारतांतील सर्व जातीजमाती, भारतातील सर्व आदिवासी जमाती, जातिसंस्था, तिचा उगम, विकास, अस्पृश्यतेचा इतिहास, निसर्गोपासना, संत व राष्ट्रपुरुष जन्मोत्सव व पुण्यतिथी, आस्तिक-नास्तिक दर्शनें, पंथोपपंथ, विद्या व कला, स्मृति, पुराणें, उपपुराणें आणि महाकाव्यें, वैदिक, पौराणिक व ऐतिहासिक राजवंश, प्रादेशिक भाषा, त्यांचा विकास, साहित्य व लोकसाहित्य, संस्कृत, प्राकृत, पालि, अर्धमागधी, प्रांतिक भाषासाहित्य, शास्त्रीय नृत्ये व लोक नृत्यें, मूर्तिकला, चित्रकला व तिच्या प्रादेशिक शैली, वेषभूषा व अलंकार, स्थापत्यशैली, शास्त्रीय संगीताचीं, ग्रामीण व आदिवासींची वाद्ये इत्यादी.
भारतीय संस्कृतीचे एक व्यापक चित्र या कोशातून उभे झाले आहे. अभ्यासक,विद्यार्थी आणि जिज्ञासू वाचकांसाठी हा कोश अमूल्य ठेवा आहे.
मराठी विश्वकोश
पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक
पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...
लोकप्रिय पोस्ट
-
पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...
-
पानावर उमटणारी त्याची अक्षरं उमलून येतात फुलं फुलून येतात तशी मानवी असण्याचा एक सरळ अर्थ प्रकट होतोय त्याच्या अक्षरात त्याची अक्षरं कधी...
-
प्रेम करा तिच्यावर .तिच्यावरच . जर जग बदलायचे असेल तर . करा प्रेम आणि जपा तिला जपा तिला हे समजून की ती आहे पावित्र्याचे अंतिम पात्र.(थाळी ...

