माझ्या लहानगे मुली
डावावर लावायचे
नाहीतर वस्त्रहरण करायचे
वनवासात पाठवायचे
नाहीतर अपहरण करायचे
वेदनांच्या अपरिहार्य बेसरबिंदीने
टोचले जाऊ नये तुझे नाक
यासाठी मी टाळत फिरतो
अवघ्या सोनारगल्ल्या.
आताशा तुझे इवलुशे पाय
जिथे पडतात तिथे,
मी अंथरतो माझे काळिज
मोकळा श्वास घेता यावा म्हणून
तुला जोजावत राहतो
माझ्या एयरकंडीशनर कुशीत.
माझे लहानगे मुली
मी जीवाचे कान केलेत तुझ्या जन्मापासून
तुझ्यातली गार्गी,सावित्री,रमाई ऎकायला
अवती भोवतीच्या मुन्नी ,लैला
अन् कुण्या शालु अनारकलीच्या
गोंगाटातही.
कुठला बाप काढतो विकायला
स्वतःच्याच मुलीला किंवा करतो खूनच तिचा?
कुठले मायबाप संगनमत करून
जन्मापूर्वीच करतात कत्तल तिची?
आता तर तपासूनच पहावी
लागेल माणसाची आदिमता.
उपटून फेकावेच लागतील
बाप नावाच्या संस्कृतीने
माणसात ओतलेले जनावरांचे जिन्स.
माझे लहानगे मुली
पृथ्वीच्या पोटात सामावल्याने
तुझी क्षमता सिद्ध होणार नाहीये
तुला यावचं लागेल रस्त्यावर
सावित्रीसारखं शेण झेलत
अखिल संसर्गाचे आकांत पोटात घेऊन.
बोबडं का होईना तुला शिकावं लागेल
मुक्ता साळवेसारखं बोलायला.
माझे लहानगे मुली
तुला सज्जच व्हावं लागेल आता
तुझ्या इवल्याशा बोटावर
ही अवघी पृथ्वी तोलायला!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा