न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका - एक लोकमान्य विश्वकोश जगामध्ये इंग्रजी भाषेत प्रसिद्ध असलेल्या ५-६ विश्वकोशांमध्ये 'न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका' या विश्वकोशाचे नांव विशेष आदर्श कोश म्हणून घेतले जाते. हा इंग्रजी भाषेतील जगातील सर्वात जुना, सुप्रसिद्ध विश्वकोश आहे. जगामधील वाचकांना, विद्यार्थ्यांना हा कोश सर्वसमावेशक, विश्वसनीय वाटतो. २५० वर्षांचा एक समृद्ध इतिहास या कोशाला लाभला आहे. ब्रिटानिका, अमेरिकाना, कोलीयर्स हे कोश इंग्रजी भाषेत 'डॅडी' कोश मानले जातात. हे कोश बहुखंडात्मक आहेत. मराठी भाषेत बहुखंडात्मक असे दोन महत्वाचे कोश आहेत. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश (१९१६- १९२८) आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी विश्वकोश.
कोशाची नोंदींची संख्या, नोंदींची अधिग्राह्यता, अचूकपणा, नोंद्लेखकांची तज्ञता, नोंदींच्या शेवटी दिलेली संदर्भसाहित्याची यादी, नोंदींची भाषा यांसारख्या मुद्द्यांचा आधाराने कोशाची गुणवत्ता ठरविली जाते. कोश वाङ्मयासंबंधी परीक्षण करण्याचे सर्व निकष तज्ज्ञांनी 'न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका' या विश्वकोशाला लावून हा कोश आदर्श ठरविला आहे. 'न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका'ची १५वी आवृत्ती १९७४ साली ३२ ग्रंथविभागात प्रसिद्ध झाली. त्या अगोदर एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या नावाने या कोशाच्या १४ आवृत्त्या १७६८ ते १९७३ या कालावधीत निरनिराळ्या साली प्रसिद्ध झाल्या. १५व्या आवृत्तीचे प्रमुख संपादक रॉबर्ट मॅक्हॅनूरी आहेत. या कोशाचे 'वार्षिक' १९७५ पासून प्रसिद्ध होत आहे व हा ग्रंथ कोशाचा 'संवर्धित भाग' म्हणून मानला जातो. हा कोश Britannica Instant Research System (CD-Rom) व Britannica Online या नांवाने संगणकावर उपलब्ध आहे. या कोशाच्या ३२ ग्रंथ विभागांतून एकूण ६५, १०० लेख दिले आहेत.
१७६८ ते १७७१ या दरम्यान हा कोश तीन विभागात एडिन्बरो, स्कॉटलंड येथे प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचे संपादक विल्यम स्मेली होते. अॅन्ड्र बेल यांनी या कोशाला ग्रंथस्वरूप दिले व कॉलीन मॅकफारक्वहार यांनी या कोशाचे प्रकाशन केले. या कोशाच्या प्रथम आवृत्तीचे नाव A Dictionary of Arts and Science असे होते. १७७८-१७८४ या काळात या कोशाची द्वितीय आणि तृतीय आवृत्ती १७८८ ते १७९९ या काळात प्रसिद्ध झाली. तिसऱ्या आवृत्तीच्या मूळ प्रतीसाठी नोंदी लिहिण्याचे काम प्रथमच कोशाबाहेरील अन्य विद्वानांनी केले. हा कोश इंग्लंडच्या राजाला अर्पण केला आहे. १९व्या शतकात या कोशाच्या नियमितपणे नवीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. १८७५ ते १८८९ या काळात या ग्रंथाची नववी आवृत्ती Scholar's Edition या नावाने २५ खंडात प्रसिद्ध झाली. १९०१ साली या ग्रंथांचे मालकी हक्क अमेरिकेतील संस्थेने विकत घेतले व आजतागायत हा कोश शिकागो येथील Encyclopedia Britannica Inc. या संस्थेतर्फे प्रकाशित होत आहे. या कोशाची ११वी आवृत्ती (१९१०-१९११) मध्ये प्रसिद्ध झाली. १९२२, १९२६, १९२९ या साली नंतरच्या आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. १९७४ साली ब्रिटानिकाची १५वी आवृत्ती प्रसिद्ध झाली. New Britannica Encyclopaedia या नावाने ३० खंडात प्रसिद्ध झालेला हा विश्वकोश नावीन्यपूर्ण व क्रांतिकारक ठरला.
तीन विभाग आहेत. १) मायक्रोपीडिया (Micropaedia) १० खंड. या खंडातून १ लाख लघुलेख छापले आहेत. साधारणपणे लघुलेख ७५० शब्दांचे आहेत. २) मॅक्रोपीडिया (Macropaedia) या विभागाचे १९ खंड आहेत. यात विविध विषयांवर ४२०० विस्तृत लेख छापले आहेत. ३) प्रोपीडिया (Propaedia) या विभागाचा एकच ग्रंथ असून त्यात मॅक्रोपीडियात आलेल्या विषयांवरच माहिती लेखन आहे. मायक्रोपीडियातील लघुलेखांचा उपयोग दुसऱ्या विभागातील लेखांची प्राथमिक माहिती सुलभ स्वरूपात मिळण्यासाठी उपयोग होतो.
१. या कोशाच्या खंडांची संख्या ३० वरून ३२ झाली.२. मायक्रोपीडियाचे खंड १० वरून १२ वर गेले. यामधील १००,००० लघुलेखांची संख्या ६५,००० वर खाली आली. व लघुलेख ७५० शब्दांच्या आसपास असावा हे बंधन सैल झाले. मायक्रोपीडियात १७००० सूचिनिर्देश समाविष्ट केले.४. मॅक्रोपीडियाची खंडसंख्या १९वरून १७वर आली. व त्यातील ४२०७ दीर्घ लेखांची संख्या ६७४वर आणली गेली. यातील काही लेखांना मायक्रोपीडियामध्ये आणले तर काही संलग्न विषय एकत्रित केले गेले.५. दोन खंडात्मक विश्लेषण करून केलेला व ५००,००० नोंदी असलेला सूचिकोश तयार केला गेला. यामुळे कोशाच्या तीनही विभागांना व वार्षिकाला सूचिकोशखंडांचा आधार लाभला. ६. प्रोपीडिया अधिक सुलभ केला गेला. ब्रिटानिकाचे 'वार्षिक' प्रकाशन आता Britannica World Data Annual या नावाने प्रकाशित होऊ लागले. जगातील इतर देशात होत असलेल्या घडामोडींची माहिती त्यात समाविष्ट झाली
ब्रिटानिका कोशाला जगात मान्यता मिळण्याची जी कारणे आहेत त्यांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे त्यात नोंदी लिहिणारे नामवंत लेखक, शास्त्रज्ञ, समाजधुरीण ! आल्बर्ट आइन्स्टाइन, सिगमंड फ्रॉइड, हॅन्री फोर्ड, बर्नार्ड शॉ, सर वॉल्टर स्कॉट, टी.इ. लॉरेन्स, जॉन एफ. केनेडी, टी. एच्. हक्सले, लिऑन ट्रॉटस्की अशासार जगमान्य व्यक्तींनी या कोशात लेख लिहिले आहेत. ब्रिटानिका कोशाचे ए वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. या कोशात लिहिलेले लेख नामवंत विद्वानांनी लिहिले आहेतच व त्या लेखांखाली त्यांचे नाव छापले जाते. ब्रिटानिकात लेख प्रसिद्ध होणे म्हणजे त्या विषयातील एक शोधनिबंध प्रसिद्ध होणे असे प्रमेय असल्यान लेखक लेख लिहिताना अतिशय कष्ट घेऊन माहिती जमवतात व जबाबदारीपूर्वक ती माहिती संपादित करतात. प्रत्येक विधानाला त्यामुळे ताजेपणाचा, सत्याचा, अद्ययावततेचा, विद्वत्तेचा आधार प्राप्त होतो. लेख वाचनीय तर होतोच, पण बाचक स्वतः प्रभावित झाल्याने ज्ञानमार्गी होतो.
१९९३ साली कोशप्रकाशनाला २२५ वर्षे झाली. आज जगात मान्य झालेल्या ५-६ कोशांपैकी हा कोश मानला जातो. Britannica Encyclopaedia Inc. ही सर्वात मोठी प्रकाशनसंस्था शिकागो येथे आहे. मुलांना उपयुक्त वाटेल असा Children's Britannica व Crompton's Encyclopaedia असे दोन बहुखंडात्मक कोश या प्रकाशनसंस्थेने प्रसिद्ध केले आहेत. १९९३ साली हा कोश इलेक्ट्रोनिक पद्धतीने Instant Research System या नावाने CD-ROM वर आला आहे. ब्रिटनमधून ( Scotland) हा कोश अमेरिकेत गेला याबद्दल अनेक ब्रिटिश नागरिक अजूनही संताप व्यक्त करताना दिसतात. वृत्तपत्रांतून यासंबंधी पत्रे प्रसिद्ध होतात. अशा निषेधपत्रांची नोंदही अमेरिकन विद्वानांनी ठेवली आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय अस्मितेशी हा ग्रंथ असा जोडला गेला आहे.
मायक्रोपीडियातील चरित्रनोंदी एकूण कोशव्याप्तीपैकी १/३ पृष्ठे व्यापतील एवढ्या लिहिल्या आहेत. चरित्र नोंदींमध्ये माणसाच्या यशाचा आढावा घेऊन त्याच्या यशाचे ऐतिहासिक, बौद्धिक व कलात्मक महत्त्व दिलेले आहे. आधुनिक काळातील ज्ञानवृद्धीच्या दिशा लक्षात घेऊन शास्त्र व तंत्रज्ञान या विषयासाठी ४० टक्के जागा या विषयांच्या लेखांनी व्यापली आहे. या कोशाला विश्वस्वरूप लाभावे यासाठी जगातील सर्व देशांतील घडणाऱ्या घटना देण्याचा विशेष प्रयत्न संपादकवर्गाने १५व्या आवृत्तीत केलेला दिसतो. खंडक्रमांक नसलेले दोन खंड सूचिलेखनासाठी वापरले आहेत. या २००० पृष्ठांत एकूण ५००,००० संदर्भ दिले आहेत. कोशात आता ४ कोटी ५० लाख शब्द दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक ९० शब्दांमागे एक संदर्भ दिला आहे. ब्रिटानिकाचा ग्रंथ आकार, त्याची बांधणी, ग्रंथासाठी वापरलेला टाइप चित्रे, फोटो, नकाशे, तक्ते, ग्रंथांची भाषा, लेखनशैली या अंगांविषयी बहुसंख्य वाचक समाधान व्यक्त करतात.
ब्रिटानिका कोश सर्वात जास्त उपयुक्त ठरल्याने त्यातील काही भाग वगळून तो चिनी भाषेत प्रसिद्ध झाला आहे. तैवान चुंग व्हा बुक कंपनीने ChineseLanguage Concise Encyclopedia Britannica या नांवाचा कोश १९८८ साली प्रसिद्ध केला. चिनी भाषा, संस्कृती, इतिहास अशा विषयांतील २६०० लेख मूळ एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये नाहीत. जपानी भाषेत ब्रिटानिका कोशाचे भाषांतर झाले आहे. मूळच्या कोशातून काही लेख गाळून त्यात जपानमधील तज्ज्ञांचे लेख समाविष्ट करून हा २९ खंडांचा कोश १९७५ साली प्रसिद्ध झाला. हा कोश जपानमध्ये 'ब्रिटानिका इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया' या नावाने ओळखला जातो. ब्रिटानिका कोशाचे कोरियन भाषेत भाषांतर झाले आहे. या कोशाचे नांव 'द ब्रिटानिका वर्ल्ड एन्सायक्लोपीडिया' असे असून त्याचे २७ खंड १९९२ पासून प्रसिद्ध झाले आहेत. कोरियन भाषा, संस्कृती, इतिहास, समाज या विषयांवरील लेख कोरियातील तज्ज्ञांनी लिहिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा