ब्लॉग शोधा

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

गाय आणि गाय

खुपदा वारंवार माझ्या बी.एड.पदवीच प्रमाणपत्र मी बघतो,त्यात गुण चांगले आहेत; पण माझं लक्ष जातं त्यावरच्या सहीवर. माझा मोठा भाऊ फार मोठ्या त्र्याग्याने बोलला होता, कि बरोबर पाय तुया मार्कसिटवर कसायाची सही हाय. मी ती सही पाहतो आणि मनाला समजावतो कि कसायालाही मुलबाळ असतील आणि तेही आपल्यासारखे शिकतच असतील. त्यांनाही पैसे लागत असतीलच.

गायीचं आणि माझं नातं हे मला समजायला तेव्हापासूनचं. आई मालिश करते मुलाची. तिचे स्निग्ध हात त्या मुलाच्या शरीराला आणि पुढे आयुष्यालाही शरीर देतात.बांधणी देतात. माझ्याही आईने माझी ही मालिश केली असावी. पण या मालिशपेक्षा माझ्या आयुष्याला अधिक स्पर्श झालाय तो गाय वासरांचा. तो स्पर्श आजही जाणवत राहतो. नुकतंच जन्मलेलं वासरू जवळ घ्यायचं आणि मग त्याने त्याच्या मऊ मुलायम आणि थोड्याश्या खरखरीत जिभेने आपलं पूर्ण अंग चाटत राहावं ,ही अशी वासराने केलेली मालिश अगदी बालपनापासून ते थोराड होईपर्यंत मी जगत आलोय. 

आजोबांनी दोन एकर शेत घेवून ठेवलं होतं. त्याबरोबर म्हैस आणि गाय घरी होतीचं. वडील गावातल्या दूध डेयरीत काम करायचे .त्यांचा असा दुधाशी संबंध होताच. घरी पेढे बनवायचे ते.पुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरी केली. फार कमी वयात नोकरी गेली त्यांची. त्यानंतरचे जगळे जीवन पुन्हा आईच्या कष्टावर आणि घरच्या गायी म्हैस यांच्यावरच निभावून गेले. आजोबा म्हैस घेवून शेतात जायचे. अगदी घोड्यासारखे ऐटीत त्या म्हैसेवर बसून त्यांचा हा प्रवास असायचा. पुढ्यात मी असायचो. म्हैस बोकांडली कि आपण पडू नये म्हणून आपले पाय टोंगळे म्हशीच्या पाठीत कसे रोवायचे याबद्दल मला सांगायचे ते मला. मांड रोवणे . साधारणता १९८५ चा काळ असावा. आजोबांनी टीबी हा आजार झाला होता. मला त्यांच्याजवळ झोपल्याशिवाय झोप येत नसे. आई वडील मला विनवायचे कि आबाजवळ झोपू नको म्हणून. मी चार वर्षाचा होतो तेंव्हा. एकदा गावातला पाटील घरी आला आणि त्याने आमची म्हैस विकत घेतली. आई नाराज होती. ती भांडत होती. खूप उंचपुरी म्हैस त्यावेळी ५००० हजार रुपयात आजोबांनी विकली. ५ रुपयांच्या त्या खूप साऱ्या हिरव्या नोटा आजही माझ्या नजरेसमोर येतात. या पैशातून त्यांनी आजारावर उपचार केले आणि पुढे विस वर्ष  आयुष्य जगले. पुन्हा घरी एक छोटी वगार घेतली आणि एक कालवडही घेतली.

गाय हा गावाच्या विश्वाचा एक खूप मोठा भाग. गावातल्या बड्या असामी माणसापासून ते रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरापर्यंत प्रत्येकाला गायीच्या अस्त्वित्वाचा स्पर्श होतो. गावातल्या दलगारात सगळ्या गायी आणि वासरे सकाळी गोळा केली जायची. गावातला गुराखी ही सगळी जनावरं मग दिवसभर गायरानात नदीकाठी चारायचा. संध्याकाळी हे दलगार सुटायचं आणि सगळ्या गायी परत आप आपल्या घरी येत. दलगारात सकाळी गायीला घेवून जाणे आणि संध्याकाळी दारातूनच तिला घरी येताना बघणे हा खूप मोठ्या आनंदाचा विषय असायचा. गाय जवळ आली कि तिच्या डोळ्यात अपार करुणा दिसते. पृथ्वीतलावर अशी अपार करुणा कोणत्याही प्राण्याच्या डोळ्यात दिसणार नाही. संध्याकाळी गाय घरी गोठ्यात आली तिच्या असण्याचं असं समाधान खूप असायचं.

आमचं गाव पूर्णा नदीच्या काठावर. खारपानपट्ट्यात वसलेलं. जुलैमध्ये शेतात पिक उमलून येतं आणि जानेवारीत अवघं शेत शिवार खाली होतं. ओलीत नसण्याने काळीभोर शेती उघडी पडते. जानेवारी ते जून हा तसा उन्हाचा काळ. निसर्गता गायीला उन्ह मानवत. उन्हात गायीला भटकंती आवडते. उलट म्हशीला पाणी आणि थंडावा लागतो. शेतं उलटली (उलंगवाडी)  कि गायीला मोकाट सोडण्याचा प्रघात होता आमच्याकडे. गायी दलगारात न सोडता मोकाट सोडायच्या. मोकाट सोडल्याने त्या अंगात भरायच्या आणि स्वतःच वाळलेलं गवत हुंगून खायच्या.आणि मिळेल तेथे पाणीही पितात. आणि या गावातल्या सर्व गायीचा स्वभाव फारच सरळ. आपल्याला मोकाट सोडलं म्हणजे आपलं गाव सोडून भलतेच कुठे गायी कधीच जात नसत. दिवसभर उन्हातानात फिरून झालं कि सगळ्या मोकाट गायी गावाशेजारी असलेल्या एखाद्या डेरेदार झाडाखाली रवंथ करीत बसलेल्या व उभ्या असायच्या. आपली गाय हुडकून काढायची असली कि लोक फक्त या झाडांखाली बघायचे. खात्रीने त्यांचे गाय वासरू कालवड तिथेच असत. मोकाटपनातली शिस्त या गायीनांच पाळता येत असावी कदाचित. आमची कबरी गायही अशीच. सरळ आणि साधी.

आजोबा सांगायचे त्यांचा एक कुणी गुरु होता. पूर्णा नदीच्या काठावर त्याने एक खोपडीवजा गुहा बांधली होती.त्यात त्याने चोवीस महिने ध्यान धारणा केली. त्याला बायकोही होती.त्याने ही ध्यान धारणा सोडावी म्हणून बायकोचा आग्रह होता. बायको त्याला भेटायला जायची. भांडायची. कधीकधी त्याची झोपडी तोडायची. तरीही तो बाधत नसे. तो चोवीस महिन्यापासून लिंबाचा आणि गोंधनचा पाला खाऊन हे सर्व ध्यान करत असे. भोन्डेश्वर या पूर्णा नदीवरील महादेवाचा तो भक्त होता. एकदा बायको म्हणाली काही खाऊन तरी साधना करा. बायकोच्या नव्हे त्या विनंतीला त्याने होकार दिला.एकदा तुझ्या हातचे अन्न खाईल म्हणून तो राजी झाला. एका पौर्णिमेला निरिच्छपणे त्याने ते जेवण घेतले. त्याची धारणा सुटावी म्हणून बायको खोटी बोलली कि मी तुमच्या जेवणात गायीचे मासाचे तुकडे टाकले होते. हे एक वाक्य त्याने एकले आणि त्याने जीव सोडून दिला. आजोबाचा हा गुरु गायीच्या माससेवनाच्या भीतीने आसमंतात विलीन झाला होता. आजोबासाठी गायीचे मास असे अभक्ष होते. पण आजोबा कसायाच्या जवळ गेले कि मला बैलाचेच असेल तर दे म्हणून आग्रह करायचे.बैलाच्या नावावर किती गायांचे मास आबांच्या पर्यायाने आमच्या पोटात गेले असेल. याची कल्पनाही करवत नाही. आजोबाचा त्यागी गुरु नजरेसमोर येतो आणि जगण्याच्या या सरळ सेवनमार्गात आपण किती अपराधीपण घेवून जगत आलोय याची वारंवार पोटात तिडीक उठते.

गावात डॉक्टर राहायचे. पती पत्नी दोघेही मलेरिया डॉक्टर म्हणून घरासमोर भाड्याने राहायचे. आले तेव्हा त्यांना एक मुलगी होती. हे डॉक्टर माझ्या आजोबांना खुपदा भेटायचे. एकांतात आजोबा आणि त्यांच्या काही देवघेवी चालायच्या. मी नेमका दहावीत होतो. आजोबा आणि त्यांना भेटायला येणारी माणस यांच्याबद्दल कायम मला वैर वाटायचं. आजोबा कुणाला बाळंतपणाचा काढा देत. अकोल्यातील एका मोठ्या दुकानातून ते कडू चिराइत नावाचे औषध आणत त्याच्या काही काही गोळ्या करत आणि त्याच त्या भेटायला येणाऱ्या लोकांना देत असत. या त्यांच्या निपुणतेमुळे लोकमानसात भानामती जादुगार अशी त्यांची प्रतिमा उभी करायचे लोक. हा मोठा इतिहास आहे. त्याचंही प्रचंड ओझं मनावर असायचं. गोळ्या जाळणे आणि लोकांना हाकलून देणे असे अनेक प्रयोग मी तेव्हा करायचो.तरीही आजोबांना डॉक्टरासारखा एखादा माणूस असा गुपचूप सापडायचाचं. कालांतराने डॉक्टरांना मुलगी झाली.या मुलीचा मी खूप लाड करायचो. पुढे ती दोन अडीच वर्ष्याची झाल्यावर डॉक्टर आमच्याकडेच मुलीसाठी दुधाला यायचे. कधी कधी रात्री बारा वाजता ते घरी यायचे. मोठ्याने आवाज देवून उठवायचे. आई घरातलं थोडं तूप कपात घ्यायची आणि गायीचा वया (आचळ) चोळायची. वया चोळून झाला कि गाय पान्हावत असे आणि मग एक गिलासभर दुध काढून डॉक्टर घेवून जायचे. गायीच्या दुध देण्याच्या वेळा दोनच.सकाळ आणि संध्याकाळ. पण आमची ही गाय अध्ये मध्ये केव्हाही दुध देत असे. डॉक्टरांचं रात्री बारानंतर दुध मागायला यायचं अनेकदा व्हायचं. आठवड्यातून दोन वेळा ते नक्की येत. मुलगी बारा वाजता उठायची. ती आधी सांभाळून ठेवलेलं दुध प्यायची नाही. डॉक्टर तडक येवून मोठ्याने आवाज द्यायचे. नंतर आईला गायीचा वळा चोळायचीही गरज पडत नसे. आई म्हणायची डॉक्टरांचा आवाज आला कि आता गाईलाच कळते कि दुध द्यायचे आहे म्हणून. डॉक्टरांचा आवाज एकूण गाय बहुधा आधीच पान्हावत असे. खूप भक्कम आधार वाटायचा तेव्हा त्या गायीचा.

(अपूर्ण )



 

 

श्रीज्ञानेश्वरी पदकोश

 ज्ञानेश्वरी या अभिजात ग्रंथातील ओवीनिहाय आलेल्या शब्दांचा आणि पदांचा कोश. ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी या कोशाची साधन ग्रंथ म्हणून मोठी उपयुक्तता आहे.ज्ञानेश्वरीतील शब्द सामर्थ्याच्या निमित्ताने मराठी साहित्य आणि संस्कृतीचा तत्वज्ञान, धर्म, भाषा, लोकजीवन, समाज असा विविध अक्ष असलेला आलेख संस्थापित होतो. हा आलेख या पदकोशातून अधिक ठळकपणे अभ्यासकांच्या लक्षात येतो. या कोशात शब्दार्थ नाहीत तर, ज्ञानेश्वरीत जो ही शब्द, पद उपसर्ग, प्रत्यय अशा विकारासह आलेला आहे त्या प्रत्येक शब्दाची नोंद त्याच्या अध्याय आणि ओवी क्रमांकासह या कोशात घेतलेली आहे. अनेकदा तज्ञ् लेखक आपल्या मतांसाठी ज्ञानेश्वरीतील ओविचा उल्लेख करतात. वाचकांवर या ओवी संदर्भाचा विशेष प्रभाव पडतो. ज्ञानेश्वरीचा विशेष अभ्यास न करताही अभ्यासकांना हव्या त्या संदर्भाची ओवी या पदकोशातून शोधता येते. पैल तो गे काऊ कोकताहे ही एक साधी ओळ आहे. यातील काऊ हा शब्द ज्ञानेश्वरांनी आणखी कुठे,कितीवेळ कोणत्या ओवीमध्ये वापराला याचा शोध या पदकोशातून लगेच घेता येतो. असा प्रत्येक अन प्रत्येक शब्द या कोशात अध्याय आणि ओवीक्रमांकासाह संपादित केला आहे. शिवाजी नरहर भावे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक. वि.का. राजवाडे यांचे सहाध्यायी. साधारणता 1920- 30 नंतर ज्ञानेश्वरीच्या अनेक स्थळप्रतीचा शोध राजवाडे यांनी घेतला. त्यातले पाठभेद लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीचे संपादन करून त्याच्या परिष्कृत प्रती प्रसिद्ध केल्या. या प्रती प्रसिद्ध केल्यानंतर राजवाडे यांच्यासमोर ज्ञानेश्वरीतील शब्दार्थ प्रकट करण्याचे आवाहन होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे दाखले देत त्याकाळात अनेक निरूपणे, कीर्तने होत असत आणि या ओव्यांचे वेगवेगळे अर्थ दिले जात असत. अर्थाची ही विविध आणि विसंगत मांडणी राजवाडे यांना पटत नसे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या ओवी ओवीचा तर्कशुद्ध अर्थच प्रकट व्हावा यासाठी राजवाडे यांनी ज्ञानेश्वरीचा शब्दार्थकोश तयार करायला घेतला होता. शब्दार्थ कोश तयार करण्यासाठी आधी पदकोश करावा लागतो. त्यासाठी त्यांनी पदकोशाचे कार्य हाती घेतले होते.


 

 पण त्यांच्या प्रकृतीस्वास्थामुळे हे कार्य त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही. वर्ध्यातील शिवाजी नरहर भावे यांनी या कार्याची जबाबदारी घेतली आणि ज्ञानेश्वरी पदकोश आणि ज्ञानेश्वरी शब्दार्थकोश हे दोन्ही प्रकल्प पूर्ण केले. प्राचीन मराठी साहित्यातील ओवी, अभंगाचे अर्थान्वयन करणे कठीण कार्य असते. वैदिक संस्कृत साहित्यातही अर्थामधली ही विविधता आढळते. मूलतः हे साहित्य धार्मिक भावनेशी निगडित असल्याने त्यात अर्थ हा विविध पद्धतीने येऊ नये यासाठीही बरेच कार्य केलेले आहे. वक्ता बोलत असताना एखादा ओवीच्या अर्थात संधिग्धता जाणवत असेल तर श्रोता लगेच समोरासमोर वक्त्याला प्रश्न विचारू शकतो. पण ग्रंथानिविष्ट ओव्या वाचताना तिथे अर्थ नीट लागत नसेल तर विचारायचे कुणाला? अशावेळी हे पदकोश उपयोगी पडतात. संस्कृतचे थोर अभ्यासक नारायणशास्त्री मराठे यांनी मीमांसाकोश नावाचा एक संस्कृत पदकोश संपादित केला आहे. संस्कृतसाहित्यात उपयोजित शब्दाचे उपयोजनानुसर तर्कशुद्ध अर्थ या कोशात संपादित करण्यात आले आहेत. भावे यांनी संपादित केलेला हा पदकोश अर्थान्वयासाठी उपयुक्त आहे. मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे शब्दसामर्थ्य या कोशातून दृष्टीस पडते. देशीकार लेणे असे पद एका ओवीत आहे. यातील लेणे हा शब्द अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर वापरतात.या कोशामुळे प्रसंगानुसार आणि उपयोजनानुसार लेणे शब्दाचे विविध अर्थ लावता येतात. या कोशामुळे लेणे या शब्दाचे ज्ञानेश्वरीतील पूर्ण उपयोजन समोर येते. ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषेचा तत्वज्ञान, धर्म, विज्ञान, समाज, उद्योग अशा अनेक विद्यशाखांशी असणारा परिचय या कोशातून लक्षात येतो. ज्ञानेश्वरांनी अगदी कोवळ्या वयात हे भाष्य आविष्कृत केले आले. ज्ञानेश्वरांची लोकविलक्षण प्रतिभा या कोशातून आपण अनुभवू शकतो.

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट