मुलगा झाला नाही म्हणून
होणारं दुःख लपविण्यासाठीच
मी मुलगी झाल्याचा आनंद तर
अशा संशयी नजरेनेच बघत होते
नातलग माझ्याकडे.
घरात नवीन जीव आलाय
या एका घटनेने मी खराच आहे आनंदी
फक्त एवढंच की,
राकेश शर्मा, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर
धोनी, विराट कोहली ही नाव जरा
धुसर झाली माझ्या नजरेसमोर.
आणि एकाएकी तरळू लागलेत चेहरे
इंदिरा गांधी, सुनीता विलीयम्स, किरण बेदी
कल्पना चावला,पी सिंधू असे काही काही.
मुलगी मोठी होत आहे,
आणि हळूहळू बोबडी बोबडी बोलती आहे.
मी सजवून ठेवले आहेत
तिच्या अवती भवती असे मोठं मोठे फोटो.
काल तिने अचानक विचारलचं
पपा हे फोटोतले लोकं कोण?
मी अतीव हर्षाने तिला सांगत होतो
ह्या जगातल्या खूप मोठ्या स्त्रिया
ज्यांच्या कामाने उजळून गेलंय जग
उद्या तुलाही व्हायचं आहे ह्यांच्यासारखं मोठं.
तिला काय समजलं, मला कळलं नाही.
मुलगी काल अचानक जवळ आली
आणि म्हणाली 'पपा मी संगीताबाई होऊ का?
संगीताबाई आपलं घर किती नीट स्वच्छ करते.
आणि एका वाक्यातचं मुलीने
उघडं केलं माझ्यातलं जनावर
श्रेष्ठत्वाचे सालस बुरखे पांघरून
समाजात समंजस्यपणे वावरणारं.
डॉ. जगतानंद भटकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा