अकोला @ ४७ आणि पुढे .....
जगबुडी किंवा जगाचा विनाश ही संकल्पना गेल्या शतकाच्या उत्तरार्धापासून माणसाला छळत आली आहे. जगबुडीच्या वेगवेगळ्या तारखा समोर येतात. त्याच्या काही थरार चित्र-संकल्पना माध्यमांकडून उभ्या केल्या जातात; परंतु तारीख ओलांडल्या गेली कि जग वाचलं अशी समजूत बाळगून लोक पुढे जातात. मग कालांतराने या विनाशाची पुढची तारीख कुणीतरी जाहीर करतो. पुन्हा दिसेल असं काही घडत नाही. मग हळूहळू जगबुडी या प्रकाराकडे दुर्लक्ष होतं. जगबुडी ही बाब कपोलकल्पना असल्याचं मानलं जातं, समजलं जातं. जगबुडी ही संकल्पना थरार चित्रपटात दाखवितात त्या पद्धतीची नसते. एका क्षणात सर्व काही संपावे अशी ती प्रक्रिया मुळीच नाही. ती अनवरत आणि निरंतर चालणारी, हळूहळू विनाश करत जाणारी धीमी प्रक्रिया आहे आणि जगभरात ही प्रक्रिया चालू आहे. उच्च तापमानाशी अनुकुलता न साधता आल्याने अनेक वनस्पती आणि प्राणी नष्ट होतात, लुप्त होतात किंवा नष्ट होण्यापासून वाचण्यासाठी अनुवांशिक बदल स्वीकारतात. ही त्यांच्या दृष्टीने जगबुडीच असते. उच्च कंप्रतेमुळे ज्या पद्धतीने चिमणी हा पक्षी नामशेष होतोय, त्या पक्षासाठी हा अनुभव म्हणजे जगबुडीच आहे.
पृथ्वीतलावरच्या ज्या भागावर ४५ - ४६ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद होते तो भाग अशा निरंतर विनाशाच्या दृष्टीने सुभेद्य असतो. ४७ अंश सेल्सिअस पर्यंत जर एखाद्या शहराचे- परिसराचे तापमान जात असेल तर त्या परिसरातील संपूर्ण जीवसृष्टी आणि वनस्पतीसृष्टीच्या संदर्भात ही स्थिती अत्यंत भयावह आहे. गेल्या दोन वर्षामध्ये अकोला जिल्हा आणि परिसराचे तापमान ४७ अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. अकोला शहर हे जगातील सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणूनही काही बातम्यांनुसार नोंदविण्यात आले होते. अकोला, अमरावती, यवतमाळ,चंद्रपूर,नागपूर वाशिम हे महाराष्ट्रातील जिल्हे या अतीव तापमानाला सामोरे जात आहेत. १९४७ मध्ये अकोल्यातील तापमान ४७ अंशापर्यंत पोहचले होते. जागतिक तापमानवाढीच्या दृष्टीने मुख्यत्वे अकोल्यातील या तापमानाचा संशोधक अभ्यास करतील; परंतु या अभ्यासातून निष्कर्षाप्रत पोहचता येणार नाही. अकोला आणि परिसरातील या उच्च तापमानाकडे स्थानिक कारणे आणि कारके यांच्या दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे.
१९७२ नंतर जागतिक तापमानवाढीकडे जगाचे लक्ष वेधले गेले. वाढते औद्योगिकिकरण, त्यातून होणारे कार्बन उत्सर्जन आणि त्यामुळे जगाचे वाढत जाणारे तापमान हा जगातल्या सर्वच बहुराष्ट्रीय मंचांचा एकमेव विषय होत आहे, झाला आहे. संयुक्त राष्ट्रे आणि काही समविचारी गट याद्वारा स्टॉकहोम (१९७२) येथून सुरु झालेला जागतिक तापमानवाढीचा हा विचार मुख्यत्त्वे औद्योगिकिकरण आणि कार्बन उत्सर्जन ह्या समस्येवर केंद्रीत होता. तीस वर्षानंतर कोस्टारिका (२००५) आणि बाली (२००७) या परिषदेत अमाप वृक्षतोड, निर्वनीकरण आणि कमी होत जाणारे कार्बनडाय ऑक्साईड संग्रहण, वाळवंटीकरण हे विषय चर्चेत आले आणि त्या दिशेने विचार आणि कार्ययोजना सुरु झाल्यात. जगातल्या विकसित आणि विकसनशील देशांनी कार्बन उत्सर्जन कमी करून जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी २००५-२०१२ आणि २०१२ ते २०२० असे दोन प्रतिबद्धता कालावधी ओलांडले आहेत. तरीही तापमानवाढ कमी होत नाही. जगाच्या कोणत्याही भूभागातील तापमानाचा प्रभाव इतर कुठल्याही भूभागावर जाणवतो. त्यासाठी वातावरणातील अभिसरण प्रवाह कारणीभूत असतात. त्यामुळे तापमानवाढ हा अख्या मानवसृष्टीसाठी भविष्याचा प्रश्न म्हणून उभा आहे. परंतु यापलीकडे त्या त्या प्रदेशातील नैसर्गिक आपत्तीसाठी आणि तापमान, पूर, भूस्खलन या समस्यांसाठी येथील स्थानिक घटक कारणीभूत असतात. हे सर्व स्थानिक घटक मानवनिर्मित असतात. अकोल्यातील ४७ अंश उच्च तापमान हे अनेक दृष्टीने स्थानिक घटकाशी निगडीत आहे. हे स्थानिक कारण म्हणजे अकोला जिल्हा आणि परिसरात झालेली अमाप वृक्षतोड आणि त्याद्वारे झालेले निर्वनीकरण होय.
निसर्ग सर्जक आहे आणि विस्थापक आणि प्रतिस्थापक अशी भूमिकाही तो बजावत असतो. ज्या बाबी जीवसृष्टीच्या निरंतरतेसाठी आवश्यक आहेत त्या निसर्गाकडून जपल्या जातात, निर्माण केल्या जातात किंवा त्यात अनुकुलता निर्माण केली जाते. सूर्यापासून पृथ्वीला उर्जा मिळते, त्या उर्जेतील आवशयक उर्जेचा वापर करून पृथ्वीपृष्ठ आणि वातावरणातील इतर घटक यांच्याद्वारा ती उर्जा परावर्तीत केली जाते. पृथ्वीची ही परावर्तन क्षमता ९७ टक्के आहे. या क्षमतेला एल्बिडो म्हटले जाते. पृथ्वीच्या उर्जाग्रहण आणि उर्जा परावर्तन या प्रक्रियेत कार्बनडाय ऑक्साइड हा वायू कार्यकारी आहे. पृथ्वीपृष्ठावरील जैवप्रक्रियेशी निगडीत असणाऱ्या थरामध्ये हा वायू उपस्थित असतो. पृथ्वीवरून दीर्घ तरंगांच्या स्वरुपात परावर्तीत होणारी उर्जा या वायूच्या प्रमाणशील थरामुळे अडते ज्यातून पृथ्वीला उबदारपणा मिळतो. परंतु ह्या परावर्तीत उर्जेचे त्या त्या प्रमाणात परावर्तन झाले नाही तर पृथ्वीपृष्ठाचे तापमान वाढते. या परावर्तनामध्ये आलेल्या अडथळ्यातूनच जागतिक तापमानवाढ ही समस्या उभी झालेली आहे. ज्यासाठी कार्बनडाय ऑक्साइड वायूचे वाढलेले प्रमाण कारणीभूत आहे.
निसर्ग विस्थापकाच्या भूमिकेतून झाडांच्या द्वारा कार्बनडाय ऑक्साइड वायूच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवत असतो. मानवी हस्तक्षेपामुळे झाडे कमी झाली आणि निसर्गाची कार्बन संग्रहण क्षमताही कमी झाली. कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आणि तो परावर्तीत उर्जा अडवून ठेवतो आहे आणि तापमान वाढते आहे. अकोला आणि परिसरात तीव्र औद्योगिकिकरण नाही; मात्र वृक्षतोड आणि त्याद्वारे झालेले निर्वनीकरण यामुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढले आहे. अकोल्यात उन्हाच्या झळा ह्या सकाळी आठ ते रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत जाणवतात. त्याचे कारण वातावरणात कार्बनमुळे अडून राहिलेली तप्त उर्जा होय. झाडे कमी असल्याने कार्बन संग्रहण (कार्बन सिंक) कमीच आहे, शिवाय झाडे, वन कमी झाल्याने फार मोठ्या प्रमाणावर भूपृष्ठ उघडे पडते. या उघड्या भूपृष्ठावरून दीर्घ तरंगात म्हणजे दुप्पट प्रमाणात उर्जा परावर्तीत होते. त्यामुळेच अकोल्यात दुपारी बारा वाजतापेक्षा दुपारी दोन -तीन वाजताचे उन्ह अतिशय तीव्र आणि असह्य असते. ते दीर्घ स्वरुपात वातावरणात अडून असते. त्यामुळेच तेथील तापमान ४७ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले आहे.
अकोला जिल्ह्यातील काही गावांमध्ये मी स्वतः अलीकडे फिरलो. वीस वर्षापूर्वी विस्तृत भूमी आच्छादन करू शकणारे आणि प्रचंड कार्बन संग्रहण क्षमता असणारे मोठमोठे वृक्ष तोडले गेले आहेत. अशा तोडलेल्या वृक्षांचे प्रमाण हे ७०-८० टक्क्यांपर्यंत आहे. तीस चाळीस वर्ष वय असणारी झाडे ही उच्च कार्बन संग्राहक असतात. आज या परिसरातून तीच झाडे गायब आहेत. पर्यावरण बदल आणि तापमानवाढ यावर जगभर संशोधने चालू आहेत. कोणत्याही कराराद्वारा वा संधीद्वारा कार्बन उत्सर्जनातून जागतिक तापमान कमी करण्याच्या प्रतिबद्धता जगाने व्यक्त केल्या तरीही तापमानवाढीवर झाड,वृक्ष हाच प्राथमिक आणि अन्योन्य उपाय आहे. त्यामुळे जगातले तापमान वाढते आहे म्हणून अकोला आणि परिसरातील तापमानही वाढते आहे या जुजबी निष्कर्षातून बाहेर पडणे गरजेचे आहे. येणाऱ्या तीस चाळीस वर्षाच्या नियोजनातून, वन आच्छादनाचे प्रमाण ठरवून वृक्षसंगोपन या परिसरात होणे गरजेचे आहे.
वाढत्या तापमानाशी कोणत्याही जीवाची होणारी अनुकुलता ही नकारात्मक असते. त्यातून समोर येणारी अनुवांशिक परिवर्तने ही तुलनेने क्षमतापूर्ण नसतात. त्यातून जाणीवेला न भिडणारी जगबुडी अवती भवती घडून येण्याची शक्यता निर्माण त्यामुळे पुढच्या समर्थ पिढ्यांचा विचार करण्यासाठी आज या परिसराला झाडांची गरज आहे. झाड लावताना फोटो काढण्याच्या संवेदनेपलीकडे जावून हे काम करावे लागेल.
डॉ.जगतानंद भटकर
( लेखक मूळ अकोला जिल्ह्यातील रहिवाशी असून महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये संपादक म्हणून कार्यरत आहेत.)