ब्लॉग शोधा

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

रमश्या

रमश्या उतरायचा ढगासारखा
रहदारीच्या मधोमध ठोकायचा पाल
थाटायचा ऐरणीवर संसार.
रमश्या पंचाई.आडनाव कधी कळलं नाही.
मायबाप डेऱ्यावर सोडून, बायको पाठी घेऊन
तो प्यायचा असं बारा गावचं पाणी.
तो विळ्याला धार लावायचा
कुऱ्हाडीला पाणी द्यायचा
पास आणायचा पट्ट्यात.
गावातल्या आभाळभर हिरवाईला
रमश्या द्यायचा धगधगून सोबत.
बचत बँक म्हणून तो रोवायचा
पालाच्या मधोमध प्लास्टिकचा डबा
कसायचा आधाराच्या कसकसून दोऱ्या
सजवायचा तांब्या जर्मनची भांडी.

लांबला मुक्काम ढगांची वाट पाहत की
रमश्या होऊ पाहायचा सेक्युलर
दिसाव्या अशा पोझमध्ये लावायचा
नजरेसमोरचं देवाचे फोटो
नाचायचा गणपतीत अवघडून
उधळायचा गुलाल नीळ वैगेरे.
उसन्या चेहऱ्याने जपायचा माणसे
लग्नात घुसायचा ,जेवायचा, वाढायचा.
कुणाला दाजी ,कुणाला मामा. काका म्हणायचा.

कधी कधी घुसमटून यायचं
नको असलेलं गणगोत बायकोभवती
रमश्या सोसायचा,राख करायचा.
आणि बरोबर घ्यायचा तंतोतंत
हातोड्याच्या आणि एरणीच्या मध्ये
अशी माजूर्डी भावना.

ढग येत राहायचे जात राहायचे
रमश्याही येत राहायचा ,जात राहायचा .
अलीकडे  असा रमश्या मला इतरत्र कुठे दिसत नाही
अदृश्य झाल्यासारखा वाटतो.
मी विचार करत राहतो
रमश्याच्या प्लॅस्टीकच्या बँकेबाबत
त्याच्या सेक्युलर अवघडलेपणाबाबत
आणि एकाएक दाटून येतं की
रमश्या आपल्यातच तर नाही ना दडून बसलाय ?
आपणही हिंडतोच आहोत की पोटापाण्यासाठी
बारा गावाचं पाणी पीत.

डॉ. जगतानंद भटकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट