पूल
गावानं कुस पालटल्या
पालटल्या
पुलावरून जायची
मीनाक्षी एक्सप्रेस.
नदीवरचा भला मोठा
पूल धडधडायचा
पुलाचं धडधडनं भरून राहायचं
मनात.
पूल मजबूत कित्येक
वर्षांपासून
पुलाचा बीम अन बीम आखीव,कातीव,रेखीव.
आबाजी सांगायचे या बीमाच्या
गोष्टी
वरच्या ,आतल्या
,खालच्या मजबुतीबद्दल.
बीमाला यावी मजबुती
म्हणून सांगायचे
गाडली जायची माणसं बीमांच्या
पायांमध्ये
दरिद्री ,परप्रांतीय
,अडाणी ,अनभिज्ञ,निष्पाप
हातावर पोट भरणारी अशी
माणसं
ठरवूनच गाडली जायची
योजना आखून.
अनुभव होता म्हणे
त्या कंत्राटदारांचा की ,
माणसं गाडली की
मजबुती येते बीमांना.
आबाजी खोटं बोलायचे
पण खरं सांगायचे .
धडधडतचं राहायचा पूल
मग आणखी
रात्री बेरात्री
दिवसा उजेडी कधीही मनात .
आताशा दिवसा उजेडी
कुस पालटतो
आणि हाती येणाऱ्या
वर्तमानपत्रातून
धडधडून येते संसद आखीव,रेखीव
बीमांसह.
मग हळूचं मुलीकडे
बघतो आणि
जूटवू लागतो ताकद सारं
काही खरं बोलण्याची.