ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

खरंच किती बरं वाटतं

खरंच किती बरं वाटतं
आपल कुणी असलं की
स्वर्ग दोन बोटंच उरतो
गालात कुणी हसलं की

जीव आपला वारा होतो
तुटलेला तारा होतो
समोरच्या गर्दी मध्ये
आपलं कुणी दिसलं की

आजुबाजुचे लोक तसे
आपले कुणीही नसतात
आपण जगाला विसरून जातो
जवळ कुणी बसलं की

कोण कुठली द्वारका ती
आपण तिला ओळखत नाही
का ळजाच्या जागेवरती
गाव प्रेमाचं वसलं की

खरंच किती बरं वाटतं
आपल कुणी असलं की
स्वर्ग दोन बोटंच उरतो
गालात कुणी हसलं की

रविवार, १७ डिसेंबर, २०१७

पहिला अभंग

माणसाची हाडे माणसाचे रक्त
खावे प्यावे फक्त  दिनरात
फ्रिजात ठेवावी  कापून बायको
 होऊन सायको   थोडावेळ
आफिसात नव्या  पोरी येताजाता
सेक्सुअल गाथा  विष्कारावा
अन्नामध्ये आणि  कालवावे विष
निष्पाप  निमिष  मिटवावे
संतांनी वाहाव्या  विर्याच्या पखाली
रेडयाची हमाली  ज्ञानासाठी

जगतानंद भटकर

दुसरा अभंग

दुसरा अभंग

जागताही खावे निजताही खावे
अवघ्यांनी व्हावे करोडपोटी
 कामानावे मन विषाळावी वाणी
पोटातले पाणी हालवून
मायबापावरी वटारावे डोळे
 डोकी घ्यावे जोडे साहेबांचे
बँकेत करावे प्रेम अपडेट
धुंडाळावी मेट रस्त्यावर
 जिंकाव्या शर्यती खाऊन चरस
मैदानी चुरस फिक्सवावी

मुलं

मुलं.....

मुलं डांबली जाताहेत पोटातल्या पोटात
लिंग, रंग, पंथ, आयक्यू इक्यूच्या सार्थ असार्थ प्रमेयांनी.
आलीच जन्माला शेवटी तर
फेकली जात आहेत भर रस्त्यावर
प्लास्टिकच्या पिशवित भरून.
भरवून ब्रह्मांडाला बेढब करण्याचा शाळा
चाळली चाळवली जात आहेत
भवतीच्या चवचाल चलाख्यांकडून.
पूरक आहाराच्या कार्यक्रमातून
वाढवताहेत मुलांची विषाक्त इम्युनिटी.
 लसीवर लसी दिल्या जाताहेत
मुलांना आऊटडेटेट औषधांच्या.
मुलं वाकत जाताहेत दप्तराच्या ओझ्याखाली
मुलं ताठ होताहेत पाठीवर दप्तर नसल्याने
मुलांना बोलू दिली जात नाहीये मायभाषा.
फुलं वाहली जावीत, कमळाची फुलं
तर मुलं वाहली जाताहेत कुकरीच्या धारेवर.

आता
आता मुलं निघाली आहेत
अत्तराच्या कुपीमध्ये अॅसिडाचे घोळ घेऊन
लाईक नावाच्या चलनी नोटांनी
विकत घेतलेले विद्वैषांचे डायनामाईट
मुलं करताहेत एका क्लिकवर शेअर.
मुलांनी घेतला आहे आता रिमोटचा ताबा
ते पाहताहेत त्यांना हवी असणारी चैनल्स.
 धावणाऱ्या प्रत्येक रेल्वेत बाँब असण्याचे गृहितक
मुलं आणताहेत निष्कर्षाप्रत.
मुलं रक्त शिंपडून साजरा करताहेत
पोलादाचा आतळभेदी संभोग.

आपणचं आपली कबर खोदावी अशा या काळात
जपली पाहिजेत छातीशी धरून तीच कमळाची फुलं
कोण जाणे एखाद्यं मुल, जाईनही चालून त्यावरून.
                                                                 
                                                                            जगतानंद भटकर

माणूस

माणूस

जग संपल्याच्या घोषणा  देणाऱ्या
आगीच्या लोळांसमोर
त्याला पत्करता नाही आली शरणागती
तो झेपावला मातीकडे
तब्बल एकशे दहाव्या मजल्यावरून
पाठीवर जगण्याचं पॅराशूट घेऊन

केवळ आवाजाने जीव जावा अशा स्थितीत
तो कोसळलाय शाळेच्या बाकावर
पोटावर आठ दहा गोळ्या  घेऊन .
तरीही त्याने सोडले नाही हातातले पुस्तक
नियंत्याचा वर्ग घेता यावा म्हणून

ते काय ते छलनी म्हणतात ना .
ते छलनी झाल्यावरही
तो बसलाय ऐसपैस स्टेशनच्या आवारात
आतडे पसरवून
आतड्यांचा अन्वयार्थ कळावा यासाठी

पापण्यांचे पंख करून
तो वल्हवत  राहिला ,वल्हवत  राहिला
समुद्रातले अजस्र जबडे ओलांडून
तो लागलाच शेवटी किनाऱ्याला

माणूस आहे शेवटी तो 
माणसाला बेमाणूस  नाही करता येत .

डॉ . जगतानंद भटकर

मी अजूनही शिकतो आहे

कळत नाही तुझं बरोबर की
 मीचं कुठेतरी चुकतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे

बीए करून बॅड झालो,
एमए करून मॅड झालो
मी सुखाच्या शोधात केवळ
 फक्त फक्त सॅड झालो
शिकतो तरीही लोक म्हणतात
 मी केवळ हुकतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे

तुझा मुलगा मामा म्हणतो
 याचं थोडं वाईट वाटते
तुझ्या नवरयाचं साधं शेकहॅण्ड
 मला जबरदस्त फाईट वाटते
हसरा हसरा संसार तुझा
रडता रडता बघतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे.

किती सहज म्हणाली होतीस ,
तुला लागणार का नोकरी?
नोकरीचं नाही तुला
तर कोण देणार छोकरी
तुझ्याविणा,नोकरीविणा
आता केवळ सुकतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे

तुझी स्वप्न पाहण्यासाठी
लवकर झोपी जायचो
तुला लवकर पाहण्यासाठी
 पहाटेच जागे व्हायचो
आता केवळ अभ्यासासाठी
 रात्र रात्र जागतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे

मला बक्षिस मिळालं की
तुचं टाळ्या वाजवायची
सर्वांदेखत अभिनंदन करून
मला मुलीसारखं लाजवायची
तुझ्याविणा कित्येक सत्कार
गळ्यामध्ये टाकतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे

माझ्या मनात कोरुन आहे
 तुझ्या लावण्याची नक्षी
तुला साधा स्पर्शसुद्धा केला नाही
याला ईश्वर आहे साक्षी
जीवनातल्या या मोहक क्षणांना
मी कायमचा मुकतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे

बाप राब राब राबतोय ,
मायचे हाल सांगत नाही
उगाच तुला माझ्यासाठी
 ऊसनी सहानुभूती मांगत नाही
पार्टटाईम जॉब करून
रोजरोज थकतो आहे
तुला दोन मुलं झालीत
मी अजुनही शिकतो आहे

माणसातलं माणूसपण
आभाळात लीफ्ट झालंय
काळजाच्या जागेवर
कॅल्क्यूलेटर शिफ्ट झालंय
हुंडा डोनेशनच्या बाजारात
जो तो स्वतःला विकतो आहे
तुला दोन मुलं झालीत
 मी अजुनही शिकतो आहे

नोकरी नाही ,भाकरी नाही
 एवढाच गुन्हा नसतो फक्त
थोडा विश्वास ठेवायचा असता
 माझ्या अंगातही होते रक्त
येवो आता वादळे कितीही
दिवा माझा टिकतो आहे
मी अजुनही शिकतो आहे ,
मी अजुनही शिकतो आहे
                                         
जगतानंद भटकर

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट